नवी दिल्ली – कर्मचारी भविष्य निर्वाह संस्था म्हणजेच ईपीएफओने शनिवारी 2021-22 सालासाठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. हा दर आणि 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के इतका राहणार आहे.
या निर्णयामुळे पाच कोटी पीएफ ठेवीदारांना त्याचा फटका बसणार आहे. गेल्या चार दशकातील हा नीचांकी व्याज दर आहे. 1977-78 साली हा दर 8 टक्के इतका होता. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत आज हा व्याज दर कपातीचा निर्णय घेण्यात आला.
नवीन व्याजदर सहमतीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठविला जाईल. अर्थ मंत्रालयामार्फत सरकारची मान्यता मिळाल्यानंतरच ईपीएफओ नवीन व्याजदर लागू करणार आहे. सन 2015-16 मध्ये व्याज दर 8.8 टक्के इतका होता. त्यानंतर मात्र हा व्याजदर ठराविक कालावधीनंतर घटतच गेला आहे.
हे व्याज कमी करण्यास कामगार संघटनांचा सतत विरोध असतो. त्यामुळे आजच्या या निर्णयाचेही विपरीत परिणाम कामगार क्षेत्रात उमटणार आहेत.