पिंपरी – कडक शिस्तीमुळे प्रशासनावर वचक असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. पालिका आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकारी यापूर्वी भाजप, शिवसेना नेत्यांच्या कलानुसार कामकाज करत होते. त्यामुळे आता त्यांची कोंडी असून पवारांच्या कलानुसार त्यांना कारभार करावा लागण्याची शक्यता आहे.(pune palakmantri)
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर (pcmc) गेल्या दीड वर्षांपासून प्रशासकी राजवट सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांचीच प्रशासक म्हणून सरकारने नियुक्ती केली. मात्र, जून 2022 मध्ये राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आले. राज्यात सत्तारूढ झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने पालिकेतील तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांची दीड वर्षांतच बदली करून आपल्या मर्जीतील शेखर सिंह यांना आयुक्त म्हणून ऑगस्ट 2022 मध्ये आणले. सिंह यांना महापालिकेत येऊन सुमारे सव्वा वर्षांच्या कालावधी झाला आहे. या कालावधीत आयुक्त सिंह यांनी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या कलानुसार कामकाज केले. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या कामांना काही प्रमाणात ब्रेक लागण्याची व पर्यायाने त्यांची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (ncp)
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होताच उपमुख्यमंत्री पवार यांनी महापालिकेत येऊन प्रलंबित प्रश्नाचा आढावा घेतला होता. तसेच भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या कामांचे लेखा परीक्षण करण्याचा इशारा दिला होता. पवार यांनी सुमारे चार तास विविध प्रलंबित कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते.
पवारच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने ते महापालिकेतील विविध कामांचा वेळोवेळी आढावा घेण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये पालिकेत आपल्या कलानुसार काम करणारे आणि मर्जीतील आयुक्तांसह इतर अधिकारी असावेत, असा विचार पवारांनी केला तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.