भुईंज -वाई तालुक्यासह परिसरातील बाजारात सध्या रसरशीत जांभळे दाखल झाली आहेत. उन्हाळ्यातील फळांमध्ये जांभूळ हे एक लोकप्रिय फळ आहे. सध्या जांभूळ फळाची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. पाऊस जसा वाढेल तशी या फळाची आवक जास्त प्रमाणात बाजारात वाढत असते. उन्हाळ्यात आंब्याबरोबरच आंबट, गोड असा स्वाद असलेल्या चिंच, बोर, जांभूळ, करवंदं अशा रानमेव्याची नावे जरी ऐकली तरी तोंडाला पाणी सुटते. निसर्गाने या प्रत्येक फळांना चवींसह औषधी गुणधर्माने समृद्ध केले आहे. आंबट आणि गोल आकाराची जांभळे खरोखरच चवीला आंबट गोड व रसरशीत असतात. उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जांभूळ बाजारात दाखल होते.
सध्या बाजारात जांभळाची आवक वाढली आहे. पण यावर्षी रसरशीत जांभळाच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लागलेले पाहायला मिळतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरात अमृतासमान कार्य करते. वर्षा ऋतूत जांभूळ महत्त्वाचे फळ मानले जाते. गोल लांबट आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट गोड व रसरशीत असतात.
जांभळाचा आस्वाद तृप्तीदायक आल्हाददायक असतो. उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारी जांभळं खाण्यामुळे आपण आरोग्य चांगले ठेवू शकतो. जांभळामधील काही गुणधर्मामुळे रक्तातील साखर, रक्तदाब नियंत्रणामध्ये येते. त्याशिवाय डोळेदेखील चांगले राहतात. जांभळामध्ये विटामिन सी, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स याशिवाय अँटी ऑक्सिडंट विटामिन आहेत. उन्हाळ्यातील फळांमध्ये जांभूळ लोकप्रिय फळ आहे.
जांभूळ या फळाचा कालावधी दोन ते अडीच महिन्यांचा असतो. निसर्गाचा लहरीपणा, घटते प्रजन्यमान, वाढती वृक्षतोड यामुळे जांभळाच्या किमती वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो या दराने बाजारात जांभळाची विक्री होत आहे.
आरोग्यासाठी अनेक फायदे
जांभूळ खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मधुमेह, हृदयविकार, पोटाचे विकार आणि त्वचा विकारावर जांभूळ गुणकारी असते. जांभूळ खाल्ल्याने आपण फिट राहू शकतो. जांभळाचे अनेक आरोग्यदायी उपयोग आहेत. मात्र, याचा उपयोग वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करणे महत्त्वाचे ठरते. जांभळाचा मोठा फायदा मधुमेहाच्या आजारात होतो. जांभळामध्ये असलेल्या मधुमेह विरोधी गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. जांभळामुळे रक्तातील साखरेचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते, जांभळाचा उपयोग मधुमेहातील प्राथमिक लक्षणावर होतो, असे सांगण्यात येते.