पुण्यात एप्रिलपासून सेवा सुरू होणार
स्पेक्ट्रम देण्यासाठी केंद्रातर्फे 14 हजार कोटी रुपयांची तरतूद
पुणे – केंद्र सरकारची भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलचे खासगीकरण होणार, अशी चर्चा सुरू असतानाच एक पाऊल पुढे टाकत बीएसएनएलने फोर-जी सेवा लवकरच सुरू करण्याची घोषणा केली आहे. एप्रिलपासून पुण्यातील ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
पुणे विभागाद्वारे फोर-जी नेटवर्कची सुविधा सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी “अपग्रेडेशन’ सुरू आहे, असे कंपनीच्या केंद्रिय मनुष्यबळ विभागाचे संचालक अरविंद वडनेकर यांनी सांगितले.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात बीएसएनएलच्या फोर-जी स्पेक्ट्रस देण्यासाठी 14 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याने बीएसएनएलने फोर-जी नेटवर्कची तयारी सुरू केली आहे. संपुर्ण भारतभरात फोर-जी स्पेक्ट्रम खरेदी करुन बीएसएनएलकडून विविध प्रकारच्या सेवा देण्यात येणार आहेत.
गेल्या तीन वर्षांत बीएसएनएल ला फोर-जी स्पेक्ट्रम देण्यासाठी केंद्र सरकारने सातत्याने विरोध केल्याने अनेक खासगी कंपन्यांनी बीएसएनएलचे ग्राहक आपल्याकडे ओढून घेतले.
सुमार दर्जाच्या नेटवर्कचा ठपका ठेवून ग्राहकांनीही बीएसएनएलची साथ सोडली होती. मात्र आता बीएसएनएलने फोर-जी नेटवर्क सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर गेलेले ग्राहक पुन्हा एकदा जोडण्याचे मोठे आव्हान कंपनीसमोर असेल.
मोबाइलधारकांसाठी आकर्षक प्लॅन्स तयार करण्यात येणार असून, रास्त दरात फोर-जी नेटवर्कची सेवा देण्यात येणार आहे. फोर-जी स्पेक्ट्रम जरी उशिरा आले असले, तरी यातून बीएसएनएलचे ग्राहक वाढणार असून उत्पन्नातही चांगली वाढ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.