पुणे – वढू येथील केईएम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि पुण्यातील भारती हॉस्पिस्पटलमध्ये करोनावरील अल्पवयीन मुलांना देण्यात येणारी लस कोव्होव्हॅक्सच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी लहान मुले आणि अल्पवयीनांची नावनोंदणी सोमवारपासून सुरू करण्यात येत आहे.
अमेरिकन औषध उत्पादक कंपनी नोव्होव्हॅक्सने विकसित केलेली कोव्होव्हॅक्स या लसीच्या भारतासह कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांसाठी व्यावसायिक उत्पादन करण्याचा करार सीरम इन्स्टिट्यूटने केला आहे. कोव्होव्हॅक्सच्या प्रौढांवरील चाचणी पूर्ण झाल्या आहेत. मात्र, रोगप्रतिकारकशक्ती संदर्भातील तपशीलाचे एकत्रीकरण आदी बाबी अद्याप सुरू आहेत. लहान मुलांवर चाचणी केली जाणारी ही भारतातील चौथी लस आहे.
दोन ते 17 वयोगटातील मुलांवर कोव्होव्हॅक्स लसीची चाचणी घेण्यासाठी सिरमला औषध नियामकांनी विषय तज्ज्ञ समितीच्या शिफारसीनुसार जुलै महिन्यात मान्यता दिली होती. वैद्यकीय चाचणी नोंदणी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन ते 17 वयोगटातील कोव्होव्हॅक्सचा रोगप्रतिारक क्षमतेवर होणारा परिणाम आणि त्याची सुरक्षितता तपासण्यासाठी ही चाचणी घेण्यात येणार आहे.
नवी दिल्लीतील हमदर्द इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने लहान मुलांवरील वैद्यकीय चाचणीसाठी यापुर्वीच नोंदणी सुरू केली आहे. त्यात 100 जणांवर ही चाचणी घेण्यात येणार आहे. सुरवातीला या 100 जणांवर चाचणी घेऊन त्याचा सुरक्षितता तपशील औषध नियामकांकडे पाठवण्यात येईल. देशभरात 10 केंद्रांवर 920 जणांवर ही चाचणी घेण्यात येणार आहे.
या अभ्यासात अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. सुरवातीला ही चचाणी 12 ते 17 वयोगटासाठी घेण्यात येईल. त्यानंतर सात ते 11 वयोगटावर आणि त्यांनतर दोन ते सहा वयोगटावर ही चचाणी घेण्यात येतील.
2 ते 17 या वयोगटातील मुलांच्या लस चाचणीला मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत नावनोंदणी सुरू करण्यात येणार असून, आमच्या अन्य चाचणी केंद्रात दिल्ली, मुंबई, वर्धा, म्हैसुरू नागपूर येथील केंद्रांचा समावेश आहे.
डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पिटल