डॉ. मेघश्री दळवी
मेडिकल सायबरनेटिक्स ही अलीकडे उदयाला आलेली वैद्यकशास्त्रातली नवी शाखा. अतिशय गुंतागुंतीच्या यांत्रिक, संगणकीय आणि सजीव अशा तिन्ही यंत्रणांचा अभ्यास या शाखेत केला जातो. त्यातून वैद्यकशास्त्रात अधिक अचूक निदान आणि उपचार करता येतील अशी कल्पना त्यामागे आहे.
संगणकाचा वापर करून अनेक यंत्रणांमध्ये सतत निरीक्षण करणं शक्य होतं. काही विसंगत घटना, चुका आढळल्या तर लगेच अलार्म देऊन सर्वांना सतर्क करता येतं. हीच पद्धत माणसाच्या शरीरासाठी वापरण्याचे अनेक प्रयोग आता होत आहेत.
शरीराचं तापमान, हृदयाचे ठोके किंवा रक्तदाब मोजणारे मेडिकल बॅंड्स आज सहज उपलब्ध आहेत. रुग्णांसाठी किंवा खेळाडूंसाठी त्यांची उपयुक्तता सिद्ध झालेली आहे. यांना वेअरेबल टेक म्हणजे अंगावर परिधान करता येईल, असं तंत्रज्ञान म्हणतात. मग हेच काम शरीराच्या आत करता आलं तर? वेअरेबलसारखं इंजेक्टेबल टेक वापरता आलं तर?
नॅनो आकाराचे संवेदक (सेन्सर्स) आणि सोबत नियंत्रण यंत्रणा हे एका सूक्ष्म चिपमध्ये बसवून टोचून शरीरात सोडता आले तर? या कल्पनेतून मेडिकल सायबरने टिक्समध्ये नवनवीन संशोधन होत आहे. ही चिप शरीराच्या आत राहून सतत नोंदी घेईल आणि काही बदल दिसले तर अलार्म देईल. त्यामुळे रोगाचं निदान अचूक आणि लवकर होईल. तसंच रुग्णावर लगेचच योग्य दिशेने उपचार सुरू करता येतील.
कोलंबिया विद्यापीठातल्या तंत्रज्ञांनी आजवरची सर्वात सूक्ष्म अशी इंजेक्टेबल चिप तयार केल्याचा दावा केला आहे. तिचा आकार आहे फक्त एक दशांश घन मिलिमीटर आणि ती नुसत्या डोळ्यांनी अजिबात पाहता येणार नाही.
सूक्ष्मदर्शकाखाली दिसणाऱ्या या अतिसूक्ष्म चिपवर एक अख्खी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे हे खरंच वाटणार नाही. पण शरीराच्या आत राहून काम करायचं असेल तर आकार इतका लहान असणं अत्यावश्यक आहे.
शरीराच्या आत घेतलेल्या नोंदी प्रक्षेपित करण्यासाठी अशा चिप्सना तितकेच सूक्ष्म पण शक्तिशाली ट्रान्समीटर्स लागतात. प्रक्षेपणासाठी रेडियो फ्रिक्वेन्सी वापरण्याऐवजी या चिपमध्ये अल्ट्रासाउंड फ्रिक्वेन्सीचा उपयोग केला आहे. त्यामुळे या चिपचा आकार इतका लहान होऊ शकला, असं या संशोधक टीमचं म्हणणं आहे.
एक नॅनोवॉटहूनही कमी शक्ती वापरून ही चिप शरीराच्या तापमानाची सतत नोंद ठेवते. अल्ट्रासाउंड उपचारांच्या दरम्यान शरीराचं तापमान वाढतं, त्याचं निरीक्षण करत राहण्यासाठी तिची चाचणी यशस्वी झालेली आहे.
संशोधकांच्या मते हीच चिपपुढे श्वसनसंस्था, रक्तातल्या शर्करेचं प्रमाण, रक्तदाब, अशा अनेक गोष्टींची नोंद घेण्यासाठी आपण वापरू शकतो. एक अख्खी स्वतंत्र यंत्रणा एकाच चिपमध्ये असल्याने ती वापरायला सुटसुटीत आहे. तिच्यातून आलेल्या नोंदींचा डेटा संगणकाला देऊन पुढचं विश्लेषणदेखील करता येईल.
अर्थात इंजेक्टेबल टेकशी संबंधित नैतिक आणि कायदेशीर बाबींचा पूर्ण विचार करून मगच पुढचं पाऊल उचलावं लागेल.