मंचर -अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील सात एकर सरकारी गायरान जागेत अज्ञात व्यक्तींनी अतिक्रमण करून शेडसाठी लोखंडी अँगल उभारले आहेत. ग्रामपंचायतीने मात्र बघ्याची भूमिका न घेता अवसरी बुद्रुक गावात गेल्या तीन वर्षांत झालेली सर्व अतिक्रमणे काढून टाकावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अवसरी बुद्रुकच्या पूर्वेला सुतार समाजाचे भवानी मातेचे मंदिर आहे. या मंदिरालगत गट क्र. 27 मध्ये सात एकर सरकारी गायरान जागा आहे. सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात ग्रामपंचायत अवसरी बुद्रुक मालकी असल्याने वरील सात एकर जागा ग्रामपंचायत मालकीची आहे. या रिकाम्या जागेवर दहा दिवसांपूर्वी पंधरा ते वीस अज्ञात व्यक्तींनी अतिक्रमण करून लोखंडी खांब उभे करून जागा निश्चित केले आहेत.
त्यानंतर सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व तलाठी यांनी जागेची पाहणी करून अतिक्रमण करणाऱ्या काही व्यक्तींना अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस देऊन ही जागा अवसरी बुद्रुक ग्रामपंचायत मालकीची आहे, असा उल्लेख असलेल्या फ्लेक्स बॅनर लावला असून, अतिक्रमण काढून घ्यावे, असा आदेश देऊनसुद्धा लोखंडी खांब अद्याप काढले नाही.
गट क्र. 27 मधील सात एकर जागा ग्रामपंचायत मालकीची असल्याने या जागेवर कोणीही अतिक्रमण करू नये. केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी नोटीस लावूनसुद्धा या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याने या संबंधित मंचर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंद केली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी मंचर पोलिसांचा बंदोबस्त मागितला आहे.
सध्या ग्रामविकास अधिकारी आजारी असल्याने ते आल्यानंतर सर्व अतिक्रमण काढले जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. संबंधित व्यक्तीने आपले अतिक्रमण स्वतः होऊन काढावे. अन्यथा ग्रामपंचायतीच्या वतीने अतिक्रमण काढण्याचा सर्व खर्च या व्यक्तीकडून वसूल केला जाईल.
– पवन हिले, सरपंच, अवसरी बुद्रुक
सुतार समाजही सांगतोय हक्क
अतिक्रमण झाले त्याठिकाणी सुतार समाजाच्या महिला दिवसभर अतिक्रमण करू नये म्हणून बसून असतात. 70 ते 80 वर्षापूर्वी सुतार समाजाचा या जागेचा उतारा निघाला असल्याने सुतार समाज या रिकाम्या जागेचा हक्क सांगत आहे.