आम्ही म्हसवडकर ग्रुपचे आंदोलन
करोना रुग्णांना बेड मिळण्यासाठी केली घोषणाबाजी
म्हसवड (प्रतिनिधी) – म्हसवड शहरात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून रोज वाढणाऱ्या रुग्णांना दाखल करण्यासाठी म्हसवडसह जिल्ह्यात कोठेही बेड उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचे हाल पाहून शहरातील आम्ही म्हसवडकर’ ग्रूपच्या कार्यकर्त्यांनी आज दि. 28 रोजी एकत्र येत म्हसवड आरोग्य केंद्रासमोर ठिय्या मांडत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. माणच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी त्याची दखल घेत म्हसवड येथे येऊन शहरातील धन्वंतरी रुग्णालय ताब्यात घेतले. आजपासून हे रुग्णालय कोव्हिड रुग्णालय म्हणून जाहीर केले. आम्ही म्हसवडकर’च्या वतीने पुकारण्यात आलेल्या आलेल्या या आंदोलनाला अखेर यश मिळाले असल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
म्हसवड शहरातील करोना रुग्णांची संख्या 170 च्या घरात गेली असून शहरात दररोज वाढत जाणाऱ्या रुग्णांना दाखल करण्यासाठी येथील कोव्हिड सेंटरमध्ये बेड उपलब्ध नाहीत, ही बाब गंभीर असल्याने म्हसवडसह परिसरातील बाधित रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होण्यासाठी म्हसवडकर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करुन प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या या मागणीकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने आज म्हसवड शहरात रुग्ण दाखल करण्यास खूप अडचणी येत आहेत. येथील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरीता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शहरातील खासगी रुग्णालये अधिग्रहण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असतानादेखील केवळ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे व खासगी रुग्णालयाशी असलेले हितसंबंध जोपासण्यासाठी प्रशासनाकडून ती ताब्यात घेण्यात आली नव्हती. मात्र, दररोज म्हसवड शहरात रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने अखेर शहरातील आम्ही म्हसवडकर’ ग्रुपने एकत्र येत येथील आरोग्य केंद्रातच ठिय्या मांडला.
जोवर म्हसवड शहरातील खासगी रुग्णालयांचे अधिग्रहण प्रशासन करणार नाही तोवर जागेवरुन न उठण्याचा निर्धार करीत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीची दखल घेत या आंदोलनाला माणच्या तहसलीदार बाई माने व प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी भेट दिली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन त्यांना सोबत घेत येथील धन्वंतरी रुग्णालय गाठले. ते रुग्णालय अधिग्रहण करुन ताब्यात घेतले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, डॉ. भारत काकडे, मुख्याधिकारी सचिन माने, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे, मंडलाधिकारी दळवी, तलाठी आखडमल आदी उपस्थित होते.