करोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्तीदान आणि कृत्रिम हौदात विसर्जन
पिंपरी – शहरामध्ये शुक्रवारी (दि. 28) सांगवी परिसरातील गणेश मंडळांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. त्याशिवाय, शहरात विविध ठिकाणी घरगुती स्वरुपात बसविण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे देखील विसर्जन करण्यात आले. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच नागरिकांनी घरीच गणेशमूर्तीचे विसर्जन केले. तर, काही नागरिकांनी कृत्रिम हौद, फिरत्या वाहनांतील हौदांमध्ये गणेशमूर्ती विसर्जन आणि गणेश मूर्तीदान केले.
सांगवीमध्ये सातव्या दिवशी गणरायाला निरोप देण्याची परंपरा आहे. यंदाही येथील गणेश मंडळांनी गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. मिरवणूका काढण्यासाठी परवानगी नसल्याने मंडळांनी साधेपणाने कृत्रिम हौद, फिरत्या वाहनांवरील हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन केले. मंडळांनी नागरिकांकडून वर्गणी गोळा न करता केवळ सभासदांकडून वर्गणी घेऊन साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. मिरवणुका नसल्याने ना ढोल ताशांचा खणखणाट होता ना डीजेचा दणदणाट. प्रभाग स्तरावर महापालिकेकडून विविध कृत्रिम हौदांजवळ गणेश मूर्तीदान घेण्याची व्यवस्था केली होती. त्याशिवाय, प्रभाग कार्यालयांकडून काही ठिकाणे निश्चित करून तेथेही गणेश मूर्तीदान घेण्याची सोय होती. घाटांजवळ निर्माल्य कुंड ठेवले होते. नदीपात्रात गणेश विसर्जनाला मनाई करण्यात आली होती.
नागरिक पर्यावरणाबाबत जागरूक
करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी गर्दी होऊ नये, या उद्देशाने बऱ्याच नागरिकांनी घरीच गणेशमूर्ती विसर्जन करण्यावर भर दिला. यंदा पर्यावरणस्नेही भूमिकेतून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत शाडू मातीतील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यावर बहुतांश नागरिकांनी भर दिला होता. नागरिकांच्या सुविधेसाठी नगरसेवकांनी त्यांच्या स्तरावर गणेश विसर्जन, मूर्तीदान आणि निर्माल्यदान यासाठी फिरत्या वाहनांद्वारे व्यवस्था केली होती. त्याशिवाय, मंडळे, संस्था यांनी देखील त्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
गणेश विसर्जनासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर यंदा फिरत्या वाहनांद्वारे मूर्तीदान घेतले जात होते. त्याशिवाय, मूर्तीदानासाठी काही ठिकाणे निश्चित केली होती. तेथेही मूर्तीदानाची व्यवस्था केली आहे. तसेच, संबंधित ठिकाणा जवळ निर्माल्य कुंडाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
– मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी, “फ’ प्रभाग कार्यालय.