वडगावशेरी- शहरात सर्वच भागात अतिक्रमणाच्या विरोधात महापालिकेची कारवाई सुरू आहे. मात्र, खराडी आणि वडगावशेरी भागात अनधिकृत व्यावसायिकांनी महापालिकेच्या नाकावर टिच्चून “बाजार’ मांडला आहे. काही व्यावसायिकांची दुकाने रस्त्यापर्यंत आली आहेत. खराडी येथील सुंदरबाई मराठे विद्यालय ते वडगावशेरी गावठाण हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर स्टेला मेरिस ही मोठी शाळा आहे, त्यामुळे या मार्गावर कोणतेही अतिक्रमण करू नये आणि व्यावसायिकांनी दुकाने थाटू नयेत, असे स्पष्ट आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
मात्र, स्वामी समर्थ मंदिर ते वडगावशेरी भागात हातगाडी चालक आणि पथारी व्यावसायिक दुकाने थाटत आहेत. या मार्गावरून पाच मिनिटाला पीएमटीची बस ये-जा करते. या मार्गावरून बस नेण्यासाठी कसरत करावी लागत असल्याची तक्रारही पीएमटी चालकांनी वरिष्ठांकडे केली आहे. यातूनच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब लक्षात घेऊन नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दुकानांपुढे पोटभाडेकरू…
खराडी येथील सुंदरबाई मराठे विद्यालय ते वडगावशेरी गावठाण मार्गावर दुकानांना 25 ते 30 हजार रुपये भाडे आहे. मात्र, जादा भाडे लाटण्यासाठी सर्वच दुकान मालकांनी शक्कल लढविली आहे. ते त्यांच्या दुकानासमोर व्यवसाय थाटणाऱ्या व्यावसायिकांकडून दररोज 200 ते 250 रुपये घेत आहेत. त्यामुळे रितसर भाडेदेऊन व्यवसाय करणारे दुकानदारही अशा पोटभाडेकरूंना वैतागले आहेत.
सुंदरबाई मराठे विद्यालय ते वडगावशेरी गावठाण मार्गावरील अतिक्रमणाच्या संदर्भात अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्याशिवाय छोटे मोठे अपघातही घडले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पुन्हा त्यांचे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे यापुढे त्याची कोणतीही गय करण्यात येणार नाही. – सुभाष तळेकर,
झोनल अधिकारी, अतिक्रमण विभाग, पुणे मनपा