पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नातदेखील 7 लाख रुपयांचा फायदा
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या “प्रोत्साहन भत्त्या’ला कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नातदेखील सुमारे 7 लाख रुपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळे येत्या 20 डिसेंबरपासून “प्रोत्साहन भत्ता योजना’ शहरातील अन्य 7 मार्गांवर राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसमधून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रोज सुमारे 10 लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. लाखो प्रवासी असले तरी पीएमपीएमएलला मिळणारे उत्पन्न तुलनेने कमी आहे. यामुळे उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने चालक, वाहकांना 8 तासांच्या एका पाळीत उत्पन्नाचे उद्दीष्ट ठरवून दिले होते. चालक, वाहकांना ठरवून दिलेल्या उद्दीष्टांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवल्यास वाढीव उत्पन्नाच्या 10 टक्के रक्कम चालक, वाहकांना “प्रोत्साहन भत्ता’ म्हणून देण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर शहरातील 3 मार्गांवर प्रशासनाने हा उपक्रम सुरू केला होता. या योजनेमुळे अनेक मार्गांवर जादा उत्पन्न मिळवण्यात प्रशासनाला यश येत आहे.
दि. 15 नोव्हेंबरपासून भत्त्याची योजना सुरू करण्यात आली. दि. 15 ते 30 ऑक्टोबरदरम्यान पीएमपीचे दैनंदिन उत्पन्न 29 लाख 39 हजार 301 रुपये होते. यामध्ये 7 लाख 6 हजार 704 रुपयांची वाढ झाली असून, दि. 15 ते 30 नोव्हेंबर या कालावधीतील उत्पन्न 36 लाख 46 हजार 004 रुपयांवर गेले आहे.
पहिल्या टप्प्यात कात्रज ते पुणे स्टेशन, कात्रज ते शिवाजीनगर आणि स्वारगेट ते धायरी या मार्गांवर ही योजना राबविली होती. तर खंडोजीबाबा चौक ते एसएनडीटी कॉलेज, पाटील इस्टेट ते दापोडी, सिमला ऑफीस ते पुणे विद्यापीठ, येरवडा ते वाघोली, डेक्कन कॉलेज ते विश्रांतवाडी, म. गांधी बसस्टॉप ते हडपसर, भोसरी ते चाकण आणि आळंदी या 7 मार्गांवर ही योजना राबविण्यात येणार आहे.