व्यवस्थापनाखालील मालमत्ता गेली विक्रमी पातळीवर
पुणे – गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर विश्वास वाढत असून सध्या म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता विक्रमी पातळीवर गेली आहे.
भारतातील म्युच्युअल फंड उद्योग 44 वर्षांचा झाला आहे. भारतातील म्युच्युअल फंड कंपन्यांची “ऍम्फी’ ही संघटना आहे. म्युच्युअल फंडातील वाढत असलेल्या गुंतवणुकीबद्दल माहिती देताना ऍम्फीने म्हटले आहे की, ऑक्टोबरमध्ये म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 26.33 लाख कोटी रुपये होती. त्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात बऱ्यापैकी म्हणजेच 3 टक्क्यांनी वाढ होऊन ती 27.04 लाख कोटी रुपये झाली आहे.
मात्र, शेअर बाजारांमध्ये मध्यंतरीच्या काळात मोठी उलथापालथ झाली होती. त्याचबरोबर शेअर बाजार निर्देशांक सध्या उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कर्जरोख्यासंदर्भातील योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये म्युच्युअल फंडातील विविध योजनांमध्ये 54 हजार 419 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. आक्टोबर महिन्यांमध्ये 1.33 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्यातील 51 हजार कोटी रुपये कर्जरोख्यासंदर्भातील योजनांमध्ये गुंतविण्यात आले आहेत.
आगामी काळात गुंतवणूक वाढणार
“ऍम्फी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश यांनी सांगितले की, जरी ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये गुंतवणुकीचा ओघ कमी झाला असला तरी म्युच्युअल फंडाकडील एकूण गुंतवणूक विक्रमी पातळीवर गेली आहे. एसआयपी योजना भारतीय गुंतवणूकदारांमध्ये अधिक लोकप्रिय होत असून या योजनेच्या माध्यमातून झालेली गुंतवणूक आता 3.12 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आगामी काळातही गुंतवणूक वाढण्याची शक्यता असल्यामुळे म्युच्युअल फंडांनी त्यासाठी विविध योजना तयार करण्यास सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले. ऑक्टोबर महिन्यामध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडात केवळ 7 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. या फंडातून 31.45 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली.