नवी दिल्ली – खासगीकरणाला विरोध म्हणून 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी देशातील वीज कंपन्यातील 15 लाख कर्मचारी संप करणार आहेत. ऑल इंडिया पावर इंजिनियर्स फेडरेशन या संस्थेने आम्ही संप करणार असल्याचे पत्रक जारी केले आहे.
देशातील इतर कामगार संघटनांनी सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करू नये यासाठी आंदोलन सुरू केले असून या कामगार संघटना संप करणार असल्याचे सांगितले. सरकारी कंपन्यांच्या कामगार संघटनांनी खासगीकरणाला वेळोवेळी विरोध केला असूनही केंद्र सरकार आणि राज्य सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आम्हाला संप करावा लागत आहे.
आमची मागणी मान्य न झाल्यानंतर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करु शकतो असा इशाराही या संघटनेने दिला आहे. बॅंका आणि इतर सरकारी क्षेत्रातील कंपन्यातील कर्मचाऱ्यानीही खासगीकरणाच्या धोरणाला विरोध केला आहे. मात्र सरकारने निर्गुंतवणूक आणि खासगीकरण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.