पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) -जिजामाता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा ठेकेदाराने ऐन दिवाळीत दोन महिने पगार थकविला आहे. पगाराला वारंवार उशिर होत असल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. बुधवारी (19) काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 145 कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग असून पगार मिळेपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
जिजामाता रुग्णालयात ठेकेदारी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पगार मिळणे अपेक्षित आहे. मात्र कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळेना झाला आहे. ऑगस्ट व सप्टेंबर अशा दोन महिन्यांपासून ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे पगार थकविले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. घरी खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. सण कसा साजरा करायचा असा संतप्त सवाल घेऊन 145 कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, वॉर्ड बॉय, वॉर्ड आया अशांचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडल्यानंतर एक महिन्याचा पगार देऊ, असे आश्वासन ठेकेदार देत आहे. मात्र दोन महिन्यांचा पगार आणि दिवाळी बोनस देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच दर महिन्याला वेळेवर पगार द्यावा, अशीही मागणी केली जात आहे. आंदोलन केल्यास कामावरून काढून टाकू, अशी धमकी दिली जाते. कोविड काळात जीवावर उदार होऊन काम केले. तरीही कोणी दखल घेत नाही. या बाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार केल्यास आमच्याशी तुमचे काही घेणे देणे नसल्याचे उत्तर मिळत असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. तर ठेकेदार म्हणतात महापालिकेने पगार दिला नाही. त्यामुळे नेमके करायचे काय, असा संतप्त प्रश्न उपस्थित करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले.