पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमुक्त झाले असल्याचा दावा केला आहे. परंतु शहरातील कोणत्याही भागात फेरफटका मारला तर कोणताच रस्ता खड्ड्यांविना दिसून येणार नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवून नागरिकांचा कररुपी पैसा लाटण्याचे काम करत आहे का असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सध्या पाऊस सुरू आहे. रात्रीच्या वेळी या मार्गांवरून प्रवास करताना दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकांना अपघात घडत आहेत. याला सर्वस्वी महापालिकेचा स्थापत्यविभाग जबाबदार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये शहरातील रस्त्यांवर खर्च करत आहे. तसेच ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत ते बुजविण्यासाठी टेंडर काढून लाखो रुपये खर्च करत आहे. असे असताना शहरातील रस्ते खड्डे मुक्त होत नसतील तर यात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा अक्षेप नागरिक करत आहेत.
स्पाइन रोडच्या सर्व्हिस रस्त्यावर खड्डे
स्पाइन रोडचा सर्व्हिस रस्ता मागील काही महिन्यांपासून खड्डेमय बनला आहे. या खड्ड्यांत दुचाकीचालकांना अपघात घडत आहेत. गाड्या घसरून पडत आहेत. परंतु याकडे महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. शरदनगर येथील हनुमान मंदिराजवळ मोठ्या प्रमाणावर रस्ता खोदाई केली परंतु रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यात आलेले नाही. येथे दररोज शेकडो नागरिक दर्शनासाठी येत आहेत. त्यांना ये-जा करताना अडचण येत आहे. तसेच एसटीपी प्लॅंटची लाइन टाकण्यासाठी स्पाइन रोडची खोदाई करण्यात आली परंतु संबंधित ठेकेदाराने रस्ता व्यवस्थित न केल्याने पावसामुळे रस्ता उखडला आहे. येथे वाहनचालकांना अपघात घडत आहेत. तसेच नेवाळे कॉम्प्लेक्सपासून पवार वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर देखील ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
अंगणवाडी रोडची झाली चाळण
मोरेवस्तीमधील अंगणवाडी रोड हा महत्त्वाचा रहदारीचा मार्ग आहे. मोरेवस्तीमधील वाघू साने चौकापासून जाणारा डीपी रोडचे काम रखडले आहे. त्यामुळे बहुतांश वाहतूक अंगणवाडी रोडने होत आहे. या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. परंतु या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.
महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी रस्त्यातील खड्डे बुजविण्याची मोहीम आखण्यात येते. परंतु यातून ठेकेदारांची घरे भरली जात आहेत पण सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या खड्ड्यांमध्ये दुचाकींना अपघात घडत आहेत. चिखली परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे आहेत. येथील खड्ड्यांची दुरुस्ती महापालिका प्रशासनाने त्वरित करून नागरिकांचा प्रवास सुखकर करावा.
– जितेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते.
सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड
रस्त्यातील खड्ड्यांमध्ये दुचाकी, चार चाकी वाहने अपटून माणसाचे शारीरिक आणि गाडीचे नुकसान होत आहे. त्यामुळे दरवर्षी कर भरून महापालिकेच्या नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ येत आहे. गाड्यांचे स्पेअर पार्ट दुरुस्ती आणि शारीरिक व्याधी निट करण्यासाठी डॉक्टरची भरती करण्याची वेळ करदात्या नागरिकांवर आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील रस्ते खड्डेमुक्त करावेत.
वाहनचालकांना शारीरिक व्याधींची समस्या
पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर कामगार व मध्यमवर्गीय नागरिक वास्तव्यास आहेत. ते आपल्या दुचाकीवरून कामासाठी कंपनी, एमआयडीसी, कार्यालय, कॉम्प्लेक्स, मॉल आदी ठिकाणी रात्री अपरात्री ये-जा करतात. परंतु रस्त्यातील खड्डे वाहनचालकांच्या लक्षात न आल्याने वाहने खड्ड्यांत अपटून अपघात होत आहेत. त्यात वाहनचालकाच्या हाता पायांना इजा होऊन जायबंदी होत आहेत. तसेच मान, कंबर आदी मनक्याचे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे गरजेचे आहे.
सोनवणे वस्ती रस्ता देतोय अपघातास निमंत्रण
चिखली -मागील काही दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरू आहे. चिखली परिसरातील बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामध्ये चिखली-आकुर्डी, चिखली- पाटीलनगर, चिखली-सोनवणेवस्ती, चिखली-कुदळवाडी मार्गावर रस्त्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. त्यामुळे रात्रीअपरात्री ये-जा करताना त्रास होत आहे.
चिखली येथून सोनवणे वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुकुल शाळेजवळ रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चालकांना अपघात घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी दोन तासामध्ये रात्री चार दुचाकीचालकांना अपघात घडले. त्यामुळे स्थानिक नागरिक राम खिळे यांनी या खड्ड्यावर जाहिरात फलक लावून वाहनचालकांना सावधानतेचा इशारा दिला. चिखली परिसरात देहू-आळंदी मार्गावर देखील मोठे खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अपघात घडत आहेत. चिखली परिसरातील महत्त्वाच्या मार्गांवरील खड्डे महापालिकेच्या स्थापत्य विभागाने त्वरित बुजवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव यांनी केली आहे.