अप्पर तहसील कार्यालयासाठी स्थानिकांमध्ये एकमत
– संदीप बोडके
थेऊर – हवेली तालुक्यातील वाघोली, थेऊर, उरुळी कांचन व कळस या चार मंडलाधिकारी कार्यालयातील तब्बल पन्नास महसूली गावांतील कार्यक्षेत्रासाठी अपर तहसीलदार म्हणून विजयकुमार चोबे यांची नियुक्ती विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्या आदेशान्वये झाली आहे. यामुळे हवेलीतील पूर्व भागाचे विभाजन होण्याच्या चर्चेचे मार्गक्रमण सुरू झाले.
तलाठ्यांकडे अतिरिक्त कार्यभाराचा बोजा
यापूर्वीच हवेलीतील तहसील कार्यालयाच्या हद्दीतील 30 गावे अप्पर तहसील पिंपरी-चिंचवडला जोडली असून अद्यापही 130 गावांचा महसूली कारभार हवेली तहसील कार्यालयातून चालवला जात होता. 130 गावांसाठी तालुक्यामध्ये 46 तलाठी सज्जा असून, यावर 8 मंडलाधिकारी आहेत. 46 गावकामगार तलाठीमधील 5 तलाठी भाऊसाहेबांच्या हवेली प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयात ड्राफ्टेड बदल्या झालेल्या आहेत, त्यामुळे काही तलाठ्यांकडे अतिरिक्त कार्यभाराचा बोजा कायम असल्याने दोन्ही सज्जांमधील कामकाज पाहताना त्यांची दमछाक होते.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अनेक कामे प्रलंबित
हवेली तहसील कार्यालयात वतन संकलन, जमीन संकलन, फौजदारी संकलन, ग्रामपंचायत संकलन, आस्थापना, जमाबंदी संकलन, कुळकायदा संकलन, पुर्नवसन संकलन, आरटीएस संकलन, अभिलेख संकलन, पुरवठा विभाग, आवक जावक संकलन, रोहयो संकलन, नागरी सुविधा, गौणखनिज संकलन व इत्यादी कार्यभार चालवला जातो, मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे येथील अनेक प्रकरणे प्रलंबित राहिल्याने कर्मचारीही हतबल झाले आहेत.