अग्निशमन वाहनाअभावी आपत्कालीन बोंबाबोंब!

तळेगाव नगरपरिषद : दीड वर्षानंतरही “अग्निशमन बंब’ प्रस्ताव लाखोट्यात अडकलेलाच

तळेगाव दाभाडे – चाकण येथे मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि मोर्चातील काही समाजकंटकांनी दंगलसदृश्‍य स्थिती निर्माण केली. त्या “अशांत चाकण’च्या मदतीसाठी धावलेला तळेगाव नगरपरिषद अग्निशमन बंब आंदोलनकर्त्यांनी “लक्ष्य’ ठरला. त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून नगरपरिषदेने शासनाकडे पत्रव्यवहार अडकून पडला आहे. त्यामुळे पर्यायाने नगरपरिषदेच्या हद्दीतील आगीच्या घटनांचा “कॉल’ अन्य प्रशासकीय यंत्रणांना “फॉरवर्ड’ करण्याची नामुष्की अग्निशमन विभागाला करावी लागत आहे. मावळ तालुक्‍यात औद्योगिक वसाहत, वनवा आणि आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास “बोंबाबोंब’ होत असल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे.

नगरपरिषदेचा अग्निशमन विभागाचे वाहन (बंब) चाकणमध्ये संतप्त जमावाने 30 जुलै 2018 रोजी झालेल्या जाळपोळीत जाळून खाक झाला. अग्निशमन दलास बंबाअभावी अडचण भासत आहे. तळेगावमध्ये काही आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास विशेषतः तळेगाव एमआयडीसीच्या बंबाचा आधार घ्यावा लागत आहे.

डिसेंबर महिन्यानंतर वनवे व आगीच्या घटना वाढत होते. दीड वर्षापासून नगरपरिषदेत अग्निशमन बंब उपलब्ध झाला होऊ शकला नाही. आणखी किती दिवस प्रतीक्षा नागरिकांना करावी लागणार, असा प्रश्‍न अग्निशमन बंबाअभावी झालेल्या वित्त व जीवितहानीच्या घटनेला जबाबदार कोण त्वरित अग्निशमन बंब उपलब्ध करण्याची मागणी नगरसेवक गणेश काकडे, अरुण माने, संतोष भेगडे, सोमा भेगडे, आशिष खांडगे, निलेश गराडे, संतप्त नागरिकांनी केली आहे.

मोहितेवाडी (साते) हद्दीत 16 फेब्रुवारी रोजी प्रिन्स हॉटेलसमोर विश्रांतीसाठी थांबलेल्या ट्रकच्या कॅबीन पेट घेतला त्यात चालक थोडक्‍यात बचावला. अग्निशमन बंब नसल्याने तसेच शॉर्टसर्किट झाल्याने भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांचे तळेगाव स्टेशन येथील मुख्य रस्त्यावरील जनसंपर्क कार्यालय जळून खाक झाले. आपत्कालीन स्थिती पाहता नगरपरिषदेकडे तातडीने अग्निशमन वाहन खरेदीची आवश्‍यकता आहे. त्यादृष्टिने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे.

तळेगाव शहराची भौगोलिक हद्द मोठी आहे. शहराची लोकसंख्या सुमारे एक लाखाच्या घरात पोहोचली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन बंबाअभावी शहरास यापुढेही मोठी झळ बसू शकते.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा सुमारे 30 लाख रुपये किंमतीचा अग्निशमन बंब देखील “लक्ष्य’ करण्यात आला. घटनेचा पंचनामा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. नगरपरिषद प्रशासनाने विम्याच्या भरपाईसाठीचे सोपस्कार पूर्ण केले आहेत. नवीन बंबासंदर्भात नगरपरिषद प्रशासनाने 23 ऑगस्ट 2018 जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे.

तसेच पाठविण्यात आलेला प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात अद्यपी प्रलंबित आहेत. लवकरात लवकर नवीन बंब उपलब्ध होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी याकामी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याची गरज सजग नागरिक व व्यवसायिकांमधून व्यक्‍त होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे सोपस्कार बंब बांधणीसाठीचा कालावधी पाहता पर्यायी अग्निशमन बंबाची व्यवस्था होणे अत्यावश्‍यक आहे. नवीन अग्निशमन बंबासाठी आणखी किती महिने प्रतीक्षा करावी लागणार याबाबत शंका निर्माण होत आहे.

आपत्कालीन स्थितीसाठी अग्निशमन बंब महिन्याभरात उपलब्ध होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार केला आहे, त्यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यावर त्वरित नवीन बंब उपलब्ध
करण्यात येईल.
– दीपक झिंजाड, मुख्याधिकारी


तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा अग्निशमन विभागातील वाहन (बंब) निकामी झाला आहे. “अत्यावश्‍यक सेवा’ असल्यामुळे नगरपरिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाशी वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच नवीन अद्ययावत अग्निशमन बंब महिनाभरात उपलब्ध होईल.
– चित्रा जगनाडे, नगराध्यक्षा,

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.