नवी दिल्ली – इस्रायल आणि हमास दरम्यानच्या संघर्षाच्या मुद्यावरून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा (United Nations Security Council) परिषेदेची आपत्कालिन बैठक आज बोलावण्यात आली आहे. गाझामधील (Gaza) संघर्षाला मानवतावादी दृष्टीकोनातून स्थगिती देण्यासाठी बंधनकारक ठरावासाठी संयुक्त अरब अमिरातीने सुरक्षा परिषदेतील अरब प्रतिनिधीच्या माध्यमातून या बैठकीची विनंती करण्यात आल्याने ही बैठक बोलावण्यात आली.
इस्रायल-हमास (Israel-Hamas) संघर्ष मानवतावादी भूमिकेचा विचार करून त्वरित थांबवण्यात यावा, अशी मागणी करणारा ठराव यापूर्वीच संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये करण्यात आला आहे. मात्र युद्धबंदी (Israel war) मान्य करण्यासाठीचा बंधनकारक ठराव करण्याचा अधिकार संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला नाही. हा अधिकार संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला आहे.
आणीबाणीच्या बैठकीची मागणी करताना, ‘युएइ’ने (UAE) आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यानुसार, नागरिकांच्या संरक्षणाचे महत्त्व, नागरिक आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय करार आणि संघर्षाच्या वेळी त्यांना लक्ष्य केले जाणार नाही याची खात्री करण्याची गरज असल्याच्या मुद्यावर यावर जोर दिला.
या ठरावानतर लगेचच मतदान घेतले जाण्याची शक्यता कमी आहे. संयुक्त राष्ट्राच्या (United Nations) आमसभेमध्ये शुक्रवारी मंजूर झालेल्या ठरावामध्ये हमासच्या हल्ल्याचा कोणताही निषेध करण्यात आला नव्हता. त्यामुळे भारताने या ठरावावरील मतदानाच्यावेळी तटस्थ राहण्याचा पर्याय निवडला होता.