कैरो, (इजिप्त) – इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदीची चर्चा रविवारपासून कतारमध्ये पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. रमजान महिना सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच इस्रायल आणि हमासचे प्रतिनिधी या युद्धबंदी विषयीच्या अप्रत्यक्ष चर्चेसाठी पहिल्यांदा एकत्र येत आहेत.
रमजान महिना सुरू झाला तेंव्हापासून आंतरराष्ट्रीय निरीक्षक किमान ६ आठवडे युद्धविराम लागू होण्याची आशा बाळगून आहेत. मात्र कायमच्या युद्धबंदीच्या मागणीवर हमास आडून आहे. याशिवाय अन्य कोणत्याही मुद्यावर कोणतीही तडजोड स्वीकारायला हमासने नकार दिला आहे. मात्र कायमची युद्धबंदीची मागणी इस्रायलने सपशेल धुडकावून लावली आहे.
अलिकडच्या काही दिवसांमध्ये युद्धविरामाला पोषक पावले दोन्ही बाजूंकडून उचलली गेली आहेत. आतापर्यंत अशी तयारी दोन्ही बाजूंकडून कधीच दाखवली गेली नव्हती. संघर्ष थांबवण्यासाठी हमासने मध्यस्थांना ३ टप्प्यांचा शांतता प्रस्ताव सुचवला होता. यानुसार ६ आठवड्यांची युद्धबंदी आणि हमासच्या ताब्यातील ३५ इस्रायली ज्येष्ठ, आजारी आणि महिलांची सुटका केली जाईल. त्याबदल्यात इस्रायलच्या तुरुंगातील ३५० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाईल.
हमासने इस्रायलच्या ५ सैनिक महिलांची सुटका करावी. त्याबदल्यात प्रत्येक सैनिक महिलेमागे पॅलेस्टाईनच्या ५० कैद्यांची सुटका व्हावी. विस्थापित पॅलेस्टिनींना उत्तर गाझामध्ये परतण्याची परवानगी मिळावी आणि या भागात मदतीचा ओघ विनाअडथळा सुरू करण्यात यावा, अशी हमासची मागणी आहे. दुसर् या टप्प्यात दोन्ही बाजूंकडून कायम युद्धबंदी लागू केली जावी आणि हमासकडून उर्वरित सर्व इस्रायलींची सुटका करावी. त्याबदल्यात इस्रायलने आणखीन पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी, असा प्रस्ताव आहे.
तिसऱ्या टप्प्यात इस्रायलच्या ओलीस नागरिकांचे मृतदेह हमास परत देणार आणि त्याबदल्यात गाझामधील नाकाबंदी इस्रायलने पूर्ण उठवावी, असा प्रस्ताव हमासने ठेवला आहे. हा प्रस्ताव अवास्तव असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. मात्र तरिही हमासबरोबरच्या चर्चेसाठी इस्रायली प्रतिनिधी कतारला पाठवण्यास त्यांनी मान्यता दिली आहे. ही चर्चा रविवारी दुपारी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. सोमवारी देखील ही चर्चा सुरू राहण्याची शक्यता आहे, असे इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.