तेल अविव – हमास आणि इस्रायलदरम्यानच्या युद्धविरामासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन प्रयत्नशील असून इस्रायलच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी ते इस्रायलला रवाना झाले आहेत. युद्धविराम आणि ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेसाठी हमासने ठेवलेल्या प्रस्तावासंदर्भात ते यावेळी चर्चा करणार आहेत.
युद्ध सुरू होऊन पाच महिने उलटून गेले तरी दोन्ही बाजूंकडून आतापर्यंत या संदर्भात सकारात्मक हालचाली झालेल्या नव्हत्या. त्यामुळे युद्धविरामासाठी कतार बरोबर अमेरिकेनेही मध्यस्थीसाठी पुढाकार घेतला आहे. इस्रायलच्या आक्रमणामुळे आतापर्यंत २७ हजार पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. गाझा पट्ट्यातील बहुतेक लोक या युद्धामुळे बेघर झाली आहे. उपासमार आणि जीवनावश्यक वस्तूंच्या अभावामुळे लोकांची अवस्था दयनीय झाली आहे.
इराणचे समर्थन असलेल्या हौथी बंडखोरांनी लाल समुद्रातील जहाजांवर आणि अमेरिकेशी संबंधित ठिकाणांवर हल्ले सुरू ठेवल्यामुळे या युद्धाची व्याप्ती आणखीन वाढण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. अमेरिका, कतार, इजिप्तबरोबर इस्रायलनेही काही आठवड्यांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. या कालावधीत हमासच्या ताब्यातील इस्रायली नागरिकांच्या सुटकेची प्रमुख मागणी होती.
हमासने या प्रस्तावाचे स्वागत केले होते. मात्र इस्रायलने संपूर्ण युद्ध समाप्त करण्याची अट देखील घातली होती. त्याचबरोबर इस्रायलच्या तुरुंगात असलेल्या हजारो पॅलेस्टिनींची सुटका करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्वतःच ही दुसरी मागणी अमान्य केली आहे.
हमासला पूर्ण संपवले जाईपर्यंत आणि हमासच्या ताब्यातील सर्व इस्रायलींची सुटका होईपर्यंत युद्ध सुरूच राहिल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी पुन्हा एकदा ठामपणे म्हटले आहे. युद्धविरामाच्या या नव्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ब्लिंकेन पाचव्यांदा इस्रायलच्या भेटीवर गेले आहेत.