जेरुसलेम – संयुक्त राष्ट्रातील ठरावाच्यावेळी अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेवरून नाराज झालेल्या इस्रायलने अमेरिकेतली एक चर्चाच टाळली आहे. रफाह शहरावरील लष्करी कारवाईच्या रणनितीसंदर्भात दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये अमेरिकेत ही बैठक होणार होती. मात्र इस्रारायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेत दाखल झालेल्या आपल्या अधिकाऱ्यांना बैठकीला न जाण्याची सूचना केली. त्यामुळे ही बैठक नियोजित वेळापत्रकानुसार होऊ शकली नाही.
मात्र आता इस्रायलने आपली भूमिका बदलली असून अमेरिकेच्या अधिकाऱ्यांबरोबरची ही बैठक नव्याने आयोजित करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. अर्थात यासाठी आता अमेरिकेची तयारी आहे का, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांनी गेल्या दोन दिवसांत वॉशिंग्टनमधील वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा यू-टर्न घेण्यात आला.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन, संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन, सीआयए प्रमुख बिल बर्न्स आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांच्याशी झालेल्या चर्चेत रफाहसह अनेक विषयांवर चर्चा झाली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अलिकडेच एक ठराव मंजूर झाला आहे. त्यामध्ये गाझातील लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची देखील बिनशर्त आणि तात्काळ सुटका करण्यात यावी, असे आवाहन हमासला करण्यात आले आहे. तात्काळ युद्धबंदी लागू करण्याच्या मागणीचे ठराव यापूर्वी सुरक्षा परिषदेत मांडण्यात आले होते, तेंव्हा अमेरिकेने नकाराधिकार वापरला होता.
मात्र अलिकडच्या ठरावाच्यावेळी अमेरिका मतदानाच्यावेळी तटस्थ राहिल्यामुळे हा ठराव मंजूर होऊ शकला होता. आतापर्यंत इस्रायलचा पाठिराखा असलेल्या अमेरिकेने ही भूमिका बदलली असल्याची टीका इस्रायलच्यावतीने केली गेली होती.