घृणास्पद! करोनाबाधित युवकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी नगरसेवकाने मागितले २२ हजार; पैसे मिळाल्यानंतर…

नालंदा – करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट देशासाठी प्रचंड हानिकारक ठरली आहे. दुसऱ्या लाटेत विषाणू संसर्गाचा वेग वाढला असून यासोबतच मृतांच्या संख्येतही वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. या संकटसमयी अनेक लोक एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येत असले तरी समाजातील काही अपप्रवृत्ती संकटकाळातही अपहाराच्या संधी शोधतायेत. अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना बिहार येथील नालंदा जिल्ह्यात घडलीये.

याबाबत मृत तरुणाच्या शेजाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, येथील सोहसराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जलालपूर भागात मनोज कुमार नामक एका युवकाचा करोनामुळे मृत्यू झाला. मात्र यानंतर येथील नगरसेवक सुशील कुमार मिठ्ठू याने करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे अंत्यसंस्कार नातेवाईकांकडून नव्हे तर पालिकेतर्फे करण्यात येतात असं सांगत २२ हजारांची मागणी केली.

नगरसेवकाच्या मागणीमुळे तरुणाचा मृतदेह तसाच पडून राहिला. यानंतर परिसरात राहणाऱ्या लोकांनी पुढे येत मनोज कुमार यांच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. मनोज कुमार याच्या मामाने कशीबशी १६ हजारांची जमवाजमव करून ती रक्कम नगरसेवकाला दिली.

पैसे मिळाल्यानंतरही नगरसेवकाचा लोभ काही सुटला नाही. त्याने पालिका कर्मचाऱ्यांनी बोलावून घेतले. यानंतर पीपीई किट घालून आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी मृतदेह चादरीत गुंडाळून कचरा गाडीवर लादून अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.

दरम्यान, नगरसेवक सुशील कुमार मिठ्ठू याने आपल्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. असं असलं तरी एखादा मृतदेह कचरा गाडीवर लादणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसतोय.

राज्यात लॉक डाऊन लागू करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी, ज्या बाधित रुग्णांचे अंत्यसंस्कार त्यांचे नातेवाईक करणार नाहीत त्यांचे अंत्यसंस्कार राज्य सरकार करेल अशी घोषणा केली होती. मात्र नालंदा जिल्ह्यातील या व्हिडीओमुळे मुख्यमंत्र्यांची घोषणा पोकळ ठरल्याचं समोर येतंय.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.