पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत इयत्ता अकरावी प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील प्रवेशासाठी अंतिम फेरी राबविण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दि.23 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत ही सर्व प्रवेश प्रक्रिया चालणार आहे.
चालू शैक्षणिक वर्षासाठी अकरावी प्रवेशासाठी आत्तापर्यंत एकूण 6 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत.
त्यातून 90 टक्क्यांपेक्षा जास्त प्रवेश पूर्ण झाले आहेत. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी केंद्रीय नियंत्रण समितीने प्रवेशासाठी अंतिम फेरी घेण्याबाबत नियोजन केले आहे. या फेरीनंतर कोणतीही प्रवेश फेरी आयोजित करण्यात येणार नाही, असे अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रवीण अहिरे यांनी स्पष्ट केले आहे.
असे असेल वेळापत्रक
दि. 23 सप्टेंबर- ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करायचा आहे, त्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात सुविधा
दि.23 ते 26 सप्टेंबर- आत्तापर्यंत प्रवेश प्रक्रियेत सहभागी न झालेल्यांचे आणि प्रवेश अर्ज अपूर्ण आहेत, त्यांचे अर्ज मार्गदर्शन केंद्रांकडून ऍप्रूव्ह करुन घेणे आवश्यक आहे.
दि.26 सप्टेंबर- दहावीच्या परीक्षेत 35 ते 100 टक्के गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार
दि.27 सप्टेंबर – विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चित करावा लागणार
दि.28 सप्टेंबर- विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश नोंदवावा लागणार.
दि.28 सप्टेंबर- रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार
दि.30 सप्टेंबर- उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करायला लागणार आहे.
दि. 1 ऑक्टोबर- प्रवेशाची पावती महाविद्यालयातून घेऊन प्रवेश निश्चित करावा.
दि.10 ऑक्टोबर- सर्व रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर होणार आहे.