अकरावी प्रवेश : विद्यार्थ्यांनो, कागदपत्रे जुळवून ठेवा

अर्जाचा भाग-1 भरणे सुरू

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीला केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्‍यक त्या सर्व कागदपत्रांची जमवाजमव करुन ठेवणे बंधनकारक आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा भाग-2 विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जासोबत विविध कागदपत्रे “सबमिट’ करावी लागणार आहेत. सर्व कागदपत्रे सादर केल्याशिवाय प्रवेश अंतिम करण्यात येणार नाही. खुल्या प्रवर्गासाठी दहावीच्या परीक्षेचे मूळ गुणपत्रक, शाळा सोडल्याचा मूळ दाखला सादर करावा लागणार आहे.

एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी, एसईबीसी, ईब्लूएस या वैधानिक आरक्षणाचा लाभ घेऊन प्रवेश घेताना दहावीचे मूळ गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा मूळ दाखला, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अथवा उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. अर्जाचा भाग-1 प्रमाणित करते वेळी या सर्वच कागदपत्रांची पडताळणी करुन घ्यावी लागणार आहे. अन्यथा संबंधित विद्यार्थ्यांच्या अर्जाचा समावेश खुल्या प्रवर्गात केला जाणार आहे. वैधानिक आरक्षणाचा लाभ महाराष्ट्राबाहेरील इतर राज्याच्या मागसवर्गीय प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांना मिळणार नाही. शासनाकडून जातीची अधिकृत यादीही प्रवेशाच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे.

कोणत्याही मंडळाकडून दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या जिल्हा बदलून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सोडल्याच्या मूळ दाखल्यावर यू-डायस क्रमांक नमूद असल्याची खात्री करावी. यू-डायस कोड नसल्यास दहावी उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांची प्रतिस्वाक्षरी घेणे आवश्‍यक आहे. परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित देशातील दूतावासाची सही व शिक्का असलेला दाखला व गुणपत्रक सादर करावे लागणार आहे. दाखला व गुणपत्रक इंग्रजी भाषेतच असले पाहिजे.

विशेष किंवा समांतर आरक्षणाचा फायदा घेऊन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचे मूळ गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, विशेष आरक्षणास पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र तयार ठेवावे लागणार आहे.

दिव्यांग, प्रकल्पग्रस्त अथवा भूकंगग्रस्त, आजी व माजी सैनिकांचे पाल्य, स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी, अनाथ मुले यांच्याबाबतीतही योग्य ते दाखले व प्रमाणपत्रे सादर करावी लागणार आहेत.

पालकांनो, तुम्हीही द्या लक्ष
बदलीने आलेल्या राज्य शासन, केंद्र शासन व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पाल्य या आरक्षण वर्गातील प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची बदली 1 ऑक्‍टोबर 2018 नंतर झालेली असावी. बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी संबंधित ऑनलाइन प्रवेश क्षेत्राबाहेरुनच इयत्ता दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. कर्मचाऱ्याचे बदली आदेश व बदलीच्या ठिकाणी रुजू झाल्याचा अहवाल प्रवेशाच्या वेळी सादर करणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)