पिंपरी -महापालिकेच्या पाच विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपकडून शुक्रवारी (दि.12) मुदतीत प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
विधी समितीसाठी स्वीनल म्हेत्रे आणि क्रीडा समितीसाठी प्रा. उत्तम केंदळे यांचा अर्ज दाखल करत त्यांना पुन्हा संधी दिली आहे. तर, महिला व बाल कल्याण सविता खुळे, शहर सुधारणा समितीसाठी अनुराधा गोरखे आणि शिक्षण समिती सभापतीपदासाठी माधवी राजापुरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
या पदासाठी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात येत्या गुरुवारी (दि. 18) सकाळी अकरा वाजता निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी भाजपकडून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे. तसेच, भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने या पाचही सभापतींची निवड बिनविरोध होणार आहे. गुरूवारी त्याची औपचारिकता पार पडेल.
फुटली नव्हे बाद ठरली – नामदेव ढाके
भारतीय जनता पक्षाचे एकही मत फुटले नसून आमच्या पक्षाचे 75 नगरसेवक असून आमच्या उमेदवारांना 72 मते मिळाली आहेत. या निवडणुकीत 9 मते बाद झाली आहेत. या 9 बाद मतांमध्ये आमच्या तीन नगरसेवकांची मते बाद झाल्याची प्रतिक्रिया भाजपाचे सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. ते म्हणाले, आमचे एकही मत फुटलेले नसून आमची तीन मते बाद झाली आहेत.
ही धोक्याची घंटा?
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका तथा महिला अध्यक्षा वैशाली काळभोर आणि शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे यांनी पीएमआरडीएच्या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला नाही. भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेल्या 75 नगरसेवकांसोबत 3 अपक्ष व नुकतेच शिवसेनेतून भाजपत आलेल्या गजानन चिंचवडे यांच्या पत्नी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे मतही भाजप उमेदवारांना मिळणार असे गृहीत धरून प्रत्येकी 13 मतांचा कोटा ठरविण्यात आला होता.त्यामुळे भाजपकडे हक्काची 78 मतांशिवाय एक अतिरिक्त मत होते. एकूण 79 मतांपैकी भाजपाला केवळ 72 मते मिळाल्याने या पक्षाची साथ सोडणाऱ्या नगरसेवकांची संख्या 7 वर पोहोचल्याचेच मतदानाद्वारे समोर आले आहे. ही भाजपसाठी धोक्याची घंटा ठरण्याचीच शक्यता मानली जात आहे.