नगरपालिका कायद्यात एकसूत्रता आणण्याचे प्रयत्न
पुणे, दि. 12 – नगरपालिका कायद्यात एकसूत्रता यावी याचा विचार करण्यासाठी समाजवादी पक्षातील संबंधित कार्यकर्त्यांची एक दिवसाची बैठक 25 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे होणार आहे. या बैठकीत पक्षाच्या पालिका निवडणुकीबाबत राज्यपातळीवरील जाहीरनाम्याचाही विचार होईल. या बैठकीसाठी पक्षाचे पालिका सदस्य, पराभूत उमेदवार व इच्छुक उमेदवार यांना प्रवेश आहे.
थकबाकीची वसुली स्थगित होणार नाही
पुणे – चालू व पुढील हंगामात शेतकऱ्यांकडून येणे असलेली शासकीय थकबाकी परिणामकारकरीत्या वसूल करण्याकरिता महसूल खात्याची व जिल्हा परिषदांची यंत्रणा गतिमान करण्यासाठी व अशाप्रकारची वसुली स्थगित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आदेश काढावयाचे नाहीत असे सरकारने ठरविले आहे. गेली तीन वर्षे पीक लागोपाठ बुडाल्यामुळे मागील थकबाकी वसूल करता आली नाही. राज्याच्या मोठ्या भागात चालू वर्षाची थकबाकीसुद्धा स्थगित करावी लागली.
सर्कस सुंदरींना बाळंतपणाच्या सवलती
नवी दिल्ली – आज राज्यसभेने बाळंतपणाच्या सवलतीचे बिल मंजूर केले. ही सवलत यापुढे सर्कसमध्ये काम करणाऱ्या स्त्री कामगारांना मिळणार आहे. याबाबत उपमजूरमंत्री वर्मा म्हणाले, सर्कस कंपन्या गावोगाव हिंडतात. तेव्हा त्यातील कामगारांचे हिताचा विचार करणे जरूर आहे. या बिलास विरोधकांकडून एकमुखी पाठिंबा मिळाला.