देहूगाव, दि. 29 – देहू नगरपंचायतीच्या विविध समितींच्या सभापती व सदस्यांचा कार्यकाल संपुष्टात येणार असल्याने 5 एप्रिल रोजी निवडणूक प्रक्रिया घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
देहू नगरपंचायतीमध्ये स्थायी समिती, बांधकाम समिती, महिला व बालकल्याण समिती, पाणीपुरवठा व जल निःसारण समिती, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती, या समिती आहेत. या समित्यांच्या सभापती व सदस्यांचा कार्यकाल 6 एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे तत्पूर्वी 5 एप्रिल रोजी सकाळी 11 ते सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत.
नगरपंचायतीमध्ये कोणत्या विषय समिती असाव्यात ते ठरविणे, तसेच स्थायी समिती व विषय समिती सदस्य संख्या ठरविणे, उपाध्यक्ष कोणत्या विषय समितीचे पदसिद्ध सभापती असतील ते ठरविणे, विषय समित्यांचे सदस्यांचे नामनिर्देशन करणे, विषय समित्यांचे सभापती पदासाठी निवडणूक घेणे, आवश्यकता वाटल्यास स्थायी समिती सदस्यांचे नामनिर्देशन ठरविणे व स्थायी समितीची रचना करणे, आदी विषय यावेळी निवडणूक प्रक्रियेमध्ये होणार आहेत.