Rahul Gandhi Panauti Remarks: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वक्तव्य केलेल्या पनौती शब्दावरून निवडणूक आयोगाने राहुल यांना गुरुवारी (23 नोव्हेंबर) कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. शनिवारी (25 नोव्हेंबर) सायंकाळी 6 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
बुधवारी (22 नोव्हेंबर) भाजपने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली होती. पक्षाचे सरचिटणीस राधामोहन दास अग्रवाल आणि आणखी एक अधिकारी ओम पाठक यांच्यासह शिष्टमंडळातील इतर नेत्यांनी राहुल गांधींचे वक्तव्य अपमानास्पद असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी पीएम मोदींविरोधात ‘पनौती’ हा शब्द वापरला होता. भारताने 50 षटकांत 240 धावा केल्या होत्या, मात्र ऑस्ट्रेलियाने 43 षटकांत 241 धावा केल्या होत्या आणि सामना सहा विकेटने जिंकला होता.
काय म्हणाले राहुल गांधी?
मंगळवारी (21 नोव्हेंबर) राजस्थानमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते, ‘पीएम म्हणजे पनौती मोदी. मोदी टीव्हीवर येऊन कधी हिंदू-मुस्लिम म्हणतात तर कधी क्रिकेटच्या सामन्यांना जातात. पराभव झाला ही वेगळी बाब आहे.”
दरम्यान, याच वक्तव्यावरून भाजप आक्रमक होत त्यांच्याकडून माफी मागावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणीही निवडणूक आयोगाकडे केली आहे.