मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात वेगवेगळे दावे वेगवेगळ्या पक्षांकडून केले जात आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि शिंदे गटावर असलेली अपात्रतेची टांगती तलवार यामुळे राजकारणात कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे. अशात पुन्हा एकदा अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहे.
नवीन युतीचा फॉर्म्युला तयार होण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात रंगत आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात अस्वस्थता दिसून येत आहे शिंदे गटाच्या नेत्यांकडून या चर्चांवर प्रतिक्रिया दिल्या जात आहे. अशात शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘अजित पवार खरच भाजपसोबत येणार का ? याबाबत शरद पवार यांना विचारलं पाहिजे. याबाबत ते सत्य काय ते सांगू शकतात. अजित पवार यांच्या मनात काय सुरु आहे, शरद पवार यांचं काय सुरु आहे आणि राष्ट्रवादी पक्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची परिस्थिती का निर्माण झाली आहे. या परिस्थितीची कारण काय आहे? ,पण एकनाथ शिंदे सांगितल त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेणार आहोत. तसेच पुढील पाच वर्षे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचं ते म्हणाले आहे.