मुंबई – आज विजयादशमीचा मुहूर्त साधत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा आज शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडणार आहे. यानिमित्ताने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या दोन्हीही मेळाव्यांकडे लागलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत सुरु असलेल्या उलथापालथी आणि बदललेले सरकार यामुळे या दोन्हही दसरा मेळाव्याचे महत्व नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात वाढलॆ आहे. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देणार आणि एकनाथ शिंदेंवर कशा प्रकारे निशाणा साधणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे आपल्या मेळाव्याद्वारे कोणता नवा गौप्यस्फोट करणार याची देखील उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.
दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी बीकेसी मैदानात हजेरी लावत तयारीचा आढावा घेतला. तर आदित्य ठाकरे यांनी देखील शिवाजीपार्कवर कामाची पाहणी केली. दोन्हीही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन यावेळी केलं जाणार आहे.
पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचाही पारंपरिक दसरा मेळावा आज होणार आहे. सध्या पंकजा मुंडे आमदार नाहीत मात्र राज्यात भाजपचे सरकार आहे. अशात या मेळाव्याद्वारे पंकजा नवीन कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.