पिंपरी – कोणताही परवाना नसताना डिझेलची विक्री करीत असताना पोलिसांनी शुक्रवारी (दि. 2) रात्री छापा मारला. त्यावेळी पावणे आठ लाखांचे भेसळयुक्त डिझेल जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश सतीश कदम (वय 24) आणि रोहन शशिकांत हडपे (वय 28, दोघेही रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक पद्मभूषण दिगंबर गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. 2) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी एमएच-12-एसएफ- 7958 या पिकअपमधून डिझेल विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून सात लाख 75 हजार 200 रुपयांचा भेसळयुक्त डिझेलचा साठा जप्त करण्यात आला. आरोपींकडे ज्वलनशील पदार्थांची साठवणूक किंवा विक्री करण्याचा कोणताही परवाना नसताना आरोपींनी बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.