मॉस्को – प्रत्यक्ष परमेश्वराचाच दर्जा आपण डॉक्टरांना देतो. त्यांचे रुग्णांप्रती असलेल्या कर्तव्याची प्रचिती अनेकदा दिसूनही आली आहे. त्याचाच प्रत्यय येथे घडलेल्या एका घटनेतून सिद्ध झाला आहे. रशियातील एका रुग्णालयाला अचानक आग लागली.
संपूर्ण रुग्णालयात धूराचे साम्राज्य पसरलेले होते. अशातच एका ऑपरेशन थिएटरमध्ये एक किचकट शस्त्रक्रीया सुरू होती. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची धडपड सुरू होती. अखेर ही शस्त्रक्रीया यशस्वी पार पडली व रुग्णासह डॉक्टर व अन्य सहकारी वर्गालाही सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.
सध्या या घटनेबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मॉस्कोतील ब्लागोवेशचेंस्क शहरातील एका रुग्णालयात आग लागली. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर अचानक आग लागली. त्याचवेळी डॉक्टरांचे एक पथक एका रुग्णाची शस्त्रक्रिया करत होते.
या रुग्णाची ओपन हार्ट सर्जरी सुरू होती. आग लागल्यावर रुग्णालयातील सगळ्यांचीच धावपळ सुरू झाली असूनही हे डॉक्टर काही आपल्या जागेवरून हलले नाहीत व त्यांनी या रुग्णाची शस्त्रक्रीया सुरूच ठेवली. ही शस्त्रक्रीया करणारे डॉक्टर या व्हिडीओत आपले मत मांडतानाही दिसत आहेत.
अग्निशामक विभागाच्या कर्मचारी वर्गाने तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली व डॉक्टरांसह या रुग्णालाही बाहेर काढले. रशियाच्या आपात्कालीन मंत्रालयाने या आठ डॉक्टर, नर्स तसेच अन्य सहकारी पथकाचे कौतुक केले आहे.
या रुग्णालयाला शंभर वर्षे पूर्ण झाली होती. संपूर्ण लाकडी बांधकाम केलेले होते. तिथे शॉर्टसर्कीटमुळे आग लागली व लाकडी छप्परने पेट घेतला व पाहता पाहता संपूर्ण रुग्णालय या आगीच्या कचाट्यात सापडले होते. शस्त्रक्रीया करणाऱ्या या पथकासह जवळपास 130 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. काही जणांना थोडीफार दुखापत झाली होती व त्यांना अन्य रुग्णालयातून प्रथमोपचार केल्यावर घरी सोडण्यातही आले आहे.