बेल्हे- जुन्नर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांना आगी लागण्याच्या घटना सुरूच आहेत. तीन दिवसांपूर्वीच नारायणगाव येथे मालवाहू टेंपो आगीत जळून खाक झाला होता. त्यानंतर आता पुष्टा वाहतूक करणाऱ्या आयशर टेंपोला आग लागली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाट्याजवळ बुधवारी २७ एप्रिल रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
पुणे येथून आयशर टेंपो पुष्टा घेऊन नाशिककडे जात असताना आळेफाट्याच्यापुढे आळेखिंड परिसरात या वाहनाला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यांनी वाहन थांबवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग इतकी भयंकर होती की काही वेळातच संपूर्ण टेंपो जळून खाक झाला. महामार्गावर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची काही वेळ कोंडी झाल्याने पोलिसांनी या दुर्घटनेनंतर पुणे-नाशिक वाहतूक एकेरी वळवली होती. मागील काळात मालवाहतूक वाहनांना आग लागण्याच्या घटना लक्षात घेता महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशानाही या वाहतूककोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.