पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पृथ्वीवर सतत वाढत जाणारी अराजकता, रक्तपात, भीषण हिंसाचार आणि दहशतवाद, तसेच करोना विषाणूमुळे होणारे मृत्यू, याशिवाय आण्विक, जैविक, रासायनिक अस्त्रांच्या प्रसारांमुळे २१ व्या शतकाचा शेवट मानवाला दिसेल का नाही, याची भीती वाटते. त्यामुळे जगात शांतता नांदायची असेल, तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्म्याचा अभ्यास व्हावा.
मनाचे रसायनशास्त्र आजपर्यंत कोणालाही कळलेले नाही. त्यासाठी शिक्षण पद्धतीत मनाच्या शास्त्राचा समावेश करावा, असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केले.
अमेरिकेच्या ऑर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथील फुलरटन हॉल येथे मराठी मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस. एन. पठाण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र- कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रा. मिलिंद पात्रे, डॉ. महेश थोरवे उपस्थित होते. या वेळी प्रा. डॉ. कराड यांनी फुलरटन हॉलमध्ये स्वामी विवेकानंदांचा पुतळा बसविण्याचा संकल्प केला. त्याला उपस्थितांनी अनुमोदन केले.
मानवी मूल्ये रूजविण्याबाबत आधुनिक शिक्षण पद्धतीत कमतरता आहे. मानवाला नैतिक आधार, मूल्ये प्रदान करण्याचे अध्यात्म एक शास्त्र आहे. त्यातूनच संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताकडे पाहिले जाते, असे प्रा. डॉ. कराड यांनी सांगितले.