शिक्षण संस्थांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे-  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री 

मुंबई: शैक्षणिक संस्थांनी महाविद्यालयांची संख्या वाढविण्यापेक्षा शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारण्याकडे लक्ष द्यावे. उपलब्ध संसाधनांचा वापर करून कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरु करुन विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देता येईल का, याकडे अधिक लक्ष द्यावे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.

आज विधानभवनात नवीन महाविद्यालय स्थापन करण्याकरिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विचारात घेऊन बृहत् आराखडा तयार करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सामंत बोलत होते.

सामंत म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विचारात घेऊन बृहत आराखडा तयार केला आहे. तो तपासून काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण कराव्यात. अभियांत्रिकी महाविद्यालातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे याचा विचार करुन याच महाविद्यालयामध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरु करण्यासंदर्भात अभ्यास करावा. स्थानिक लोकांच्या गरजा लक्षात घेऊन व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करावा, असेही सामंत यांनी सांगितले.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालनालय संचालक डॉ. अभय वाघ तसेच विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.