पुणे – बारावीची फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाची संधी राज्य सीईटी सेलने उपलब्ध करून दिली आहे. अभियांत्रिकी ( Engineering ), पाच वर्षीय विधी (लॉ) अभ्यासक्रम (Law courses) आणि एमबीए ( MBA )या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेता येणार आहे. मात्र त्यासाठी आज आणि उद्या (दि.15) या दोन दिवसाची मुदत देण्यात आली आहे. (Education)
बारावी फेरपरीक्षेचा निकाल (12th exam result) जाहीर झाला. मात्र त्यापूर्वीच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत होते. ही बाब उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
या विद्यार्थ्यांना संस्थास्तरावरील प्रवेशासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पालकांतून होत होती. त्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रवेशासाठी लिंक खुली करीत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. प्रवेशाची लिंक शुक्रवारी (दि.15) रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील. त्यामुळे अद्यापही काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत, त्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे.