लोकहो, तिबेटला विसरू नका; भारत निवासी दलाई लामांची जगाला हाक
नवी दिल्ली, ता. 10 – तिबेटचे निर्वासित दलाई लामा यांनी जगातील सर्व राष्ट्रांना अशी विनंती केली की, तिबेटच्या लढ्याकडे दुर्लक्ष करू नका. तिबेट हा छोटा देश असला तरी तो एक स्वतंत्र देश आहे. आज त्या देशावर पाशवी बळ वापरून एका साम्राज्यवादी व माथेफिरू राष्ट्राने कब्जा केला आहे. असे निवेदन दलाई लामांनी तिबेटी बंडाच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त प्रसिद्धीस दिले.
या पत्रकात दलाई लामा म्हणतात, 10 मार्च हा दिवस तिबेटी लोकांच्या इतिहासात संस्मरणीय आहे. स्वातंत्र्यासाठी लढताना जे मेले व जे अद्याप लढत आहेत त्यांचेबद्दल मला अतिशय अभिमान वाटतो. मी तिबेट सोडल्यापासून तिथे चिनी कम्युनिस्ट कुटुंबांचा उच्छेद, धर्माचा उच्छेद व सर्व लोकांवर वेठ बिगारी लादून त्यांना गुलाम करणे अशा “सुधारणा’ करीत आहेत. परमेश्वराला पार्थना आहे या “सुधारणां’पासून देशाला सोडीव.
भारतात बनणाऱ्या मोटारींच्या किमती कमी करण्याची सूचना
नवी दिल्ली – भारतातील मोटारधंद्याची चौकशी करण्यासाठी व कमी किमतीच्या मोटारी तयार करण्याची शक्यता पाहून शिफारशी करण्यासाठी नेमलेल्या खास समितीने मोटारीचा नमुना ठरविण्याचे काम सरकारवरच सोपविले आहे. ही समिती झा समिती या नावाने ओळखली जाते. तिने आणखी अशीही शिफारस केली आहे की, भारतात बनणाऱ्या मोटारीच्या किमतीत येत्या काही महिन्यांत थोडी कपात करावी.
प्रेस कायदा दुरुस्ती विधेयक मांडले
नवी दिल्ली- प्रेस आणि पुस्तक नोंदणी कायदा दुरुस्ती विधेयक माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री डॉ. केसकर यांनी आज राज्यसभेत मांडले. विशिष्ट परिस्थितीत प्रेसचे डिक्लेरेशन रद्द करता यावे अशी तरतूद करणे हा या दुरुस्तीचा उद्देश आहे. सरकार नेमणार असलेल्या मंडळाकडे या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करता येईल.