इंदिराजी पुन्हा लोकशाही प्रस्थापित करतील
नवी दिल्ली, दि. 12 – लोकशाहीला पुन्हा जीवदान देऊन 50 कोटी भारतीयांचे स्वातंत्र्य इंदिराजी पुन्हा प्रस्थापित करतील, असा आशावाद प. आशियायी वृत्तपत्रांनी व्यक्त केला असून इंदिराजींनी विरोधकांविरूद्ध केलेल्या कारवाईला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे. कैरोच्या अखबार वृत्तपत्राचे संपादक मुस्ताफा अमीन यांनी म्हटले आहे की, इंदिराजींच्या समाजवादाच्या लढ्यात आम्ही त्यांच्या बाजूने आहोत तसेच अतिरेक्यांच्या हातून भारतात कट करण्याचा परकीय प्रयत्न करत असतील, तर आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. अशाच प्रकारचे मत लेबाननच्या अल हनार, बेरूतच्या अल सफीर आदी पत्रांनी व्यक्त केले आहे.
अंतराळवीरांसाठी चविष्ट, पोषक आहार
मॉस्को – अंतराळात रशिया-अमेरिका यांचा संयुक्त उड्डाणाचा प्रयोग होणार आहे. त्यावेळी रशियन अंतराळवीरांसाठी एक चवदार विविधता पूर्ण व समतोल असा आहार रशियन खाद्यतज्ज्ञांनी तयार केला आहे. 4 वेळा त्या आहाराचे वाटप केले जाईल व त्याची कॅलरी उष्णता 3000 असेल.
कुटुंब नियोजन लोकप्रिय
कलकत्ता – गर्भ प्रतिबंधक साधन म्हणून निरोधाची लोकप्रियता वाढत्या प्रमाणावर आहे. गेल्या 4 वर्षांत निरोधाचा खप आश्चर्यकारकरित्या वाढला आहे, असे कुटुंब नियोजन संस्थेने जाहीर केले आहे. कुटुंब नियोजनाची साधने फुकट वाटता यावी, एवढे उत्पादन होईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे.