द्विभाषिक विधानसभेचे अखेरी अधिवेशन समाप्त
मुंबई, ता. 25 – द्विभाषिक मुंबई राज्याच्या विधानसभेचे शेवटचे अधिवेशन आज राज्यपालांचे हुकूमाने बेमुदत तहकुब करण्यात आले. महाराष्ट्र व गुजराथ राज्याचे नियोजित मुख्यमंत्री चव्हाण व जीवराज मेहता यांनी नवराज्य प्रस्थापनेनंतर सहकार्याने वागवण्याचे एकमेकास अभिवचन दिले.
व्ही. डी. देशपांडे, नगीनदास गांधी, वर्टी आणि जसवंत मेहता यांनी महाराष्ट्र-गुजराथची “अटळ’ ताटातूट होत असल्याबद्दल वाटणारे दुःख व्यक्त करणारी भाषणे केली. एकमेकांना सदिच्छा सहकार्य भावनेने वागण्याचे आश्वासन दिले.
भारतात घड्याळांचा कारखाना निघणार, जपानी कंपनीशी करार
नवी दिल्ली – भारतात घड्याळाचा कारखाना काढण्यासाठी सिटिझन वॉच कंपनीशी (जपान) आज येथे भारत सरकारने करार केला.
ग्रंथालय-वस्तुसंग्रहालय योजनेवर पाणी पडले
पुणे – म्युनिसिपल शाळांसाठी मध्यवर्ती शालेय ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय सुरू करण्याच्या म्युनिसिपल स्कूल बोर्डाच्या योजनेवर आज अखेर पाणी पडले. कॉर्पोरेशनची मान्यता मिळाल्यानंतर ही योजना स्कूल बोर्डाकडे कार्यवाही करण्याकरिता आली होती. परंतु आज सकाळी झालेल्या स्कूलबोर्डाच्या सभेत ही योजना कार्यवाही करू नये असा ठराव संमत करण्यात आला.
चीन-नेपाळ सरहद्द आखणी होणार
हॉंगकॉंग – नेपाळ-चीन सरहद्द आखणीचे काम काही महिन्यांतच पुरे होईल असे नेपाळचे पंतप्रधान कोईराला यांनी निवेदन केले. पेकिंगमध्ये झालेल्या करारानुसार उभयराष्ट्र सरहद्द कमिशन लगेच काम सुरू करील. नेपाळ-चीनचे दरम्यानचेच हे प्रश्न असल्याने भारतास सल्ला विचारण्यात येणार नाही. असाही त्यांनी पत्रकारांजवळ खुलासा केला.