अबाऊट टर्न : नहीं सुधरेंगे!

-हिमांशू

कुठेच काही घडलं नव्हतं. कुठलाही विषाणू वगैरे आलेला नव्हता. माणसं आजारी पडली नव्हती. रुग्णालयं गर्दीनं ओसंडून वाहत नव्हती. एखाद्याला त्रास झालाच तर लगेच बेड उपलब्ध होत होता. व्हेन्टिलेटर मिळाला नाही म्हणून कुणी मरत नव्हतं. केवळ रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही म्हणून कुणाचा बळी गेलाच नव्हता. “पॅन्डेमिक, पॅन्डेमिक’ म्हणून कोकलणारे चक्‍क खोटं बोलत होते. तोंडाला येईल ते बरळत होते. धडधाकट माणसाला घाबरवून टाकत होते आणि म्हणूनच तो मरत होता. टीव्हीच्या पडद्यावर दिसणारे रुग्णांचे आणि मृतांचे आकडेसुद्धा कदाचित खोटेच होते. या आजारानं घेतलेले महनीय व्यक्‍तींचे बळीही बहुधा खोटेच असावेत.

आम्ही जेव्हा-जेव्हा विसरू पाहात होतो, तेव्हा-तेव्हा “करोना-करोना’ म्हणून काहीजण शंख करत होते. अनेक महिने आम्हा सर्वांना विनाकारणच घरात डांबून ठेवलं. अर्थव्यवस्थेची वाट लागली. आमच्या नोकरी-धंद्याची वाट लागली. आजाराच्या नावाखाली फार्मा कंपन्या आणि रुग्णालयांनी मात्र उखळ पांढरं करून घेतलं. आता जरा आम्ही बाहेर पडू लागलो आहोत, तर लगेच ही मंडळी “दुसरी लाट, दुसरी लाट’ म्हणून ओरडू लागलीत. इटली आणि जर्मनीच्या कथा सांगू लागलीत. आम्ही त्याला घाबरलो नाही, तेव्हा त्यांनी इटलीचा बागुलबुवा चक्‍क दिल्लीत आणला. आता तर पुण्यात आणि नागपुरातही पेशंट पुन्हा वाढत असल्याची आवई मुद्दाम उठवली जातेय.

दिल्लीत म्हणे तासाला पाच माणसं मरायला लागलीत. पण ही माहिती आम्हाला कशाला सांगता? आज कुणाचा मोर्चा, कुणाचं आंदोलन, कुणाची निदर्शनं कुठं आणि किती वाजता होणार आहेत, एवढंच सांगा. आंदोलनाचं कारणसुद्धा विचारणार नाही आम्ही. एकत्र जमणंच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. जगातली कोणतीही शक्‍ती आम्हाला एकमेकांपासून दूर ठेवू शकत नाही. आम्हाला एकटं पाडण्याचा कुणाचाही डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.

गुटख्यावर बंदी घातलीत तरी पान-तंबाखू आमच्याकडे आहेच. (गुटखा आणि मावाही मिळतोच मागल्या दारानं!) कितीही दंडवसुली केलीत तरी रस्त्यावर थुंकण्याची थोर परंपरा आम्ही खंडित होऊ देणार नाही. गळ्यात गळे घालून वावरण्याचा आमचा शिरस्ता सोशल डिस्टन्सिंगच्या कोणत्याही भुक्‍कड नियमामुळे आम्ही मोडणार नाही.

यंदा दिवाळीची खरेदी ऑनलाइन करण्याकडेच लोकांचा कल आहे, असं सांगून आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु हाही कट उधळून लावत आम्ही प्रचंड गर्दी करून बाजारपेठांची शोभा वाढवलीच. दिवाळीत ज्या शहरांत फटाके कमी प्रमाणात वाजले, त्यांचं जाहीर कौतुक करून वृत्तवाहिन्यांनी आम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही बातमी ऐकल्याबरोबर आम्ही हजार फटाक्‍यांची माळ लावली. जाळ अन्‌ धूर संगटच!

आता, धुरात धुकं किंवा धुक्‍यात धूर मिसळल्यावर “स्मॉग’ की काहीतरी तयार होतं आणि ते शरीरासाठी घातक असतं असं सांगणारे तथाकथित तज्ज्ञ आमचं डोकं खाऊ लागतील. पुन्हा दिल्लीचाच दाखला देतील. पण आमच्या गल्लीत या तज्ज्ञांची बडबड आम्ही खपवून घेणार नाही. थंडी वाढल्यावर संसर्ग वाढेल, असं भाकित करणारे आमच्या कानापर्यंत पोहोचू शकत नाहीत, तर मेंदूपर्यंत कधी पोहोचणार! न दिसणाऱ्या क्षुल्लक विषाणूला घाबरून स्वतःमध्ये बदल करण्याइतके बावळट आम्ही नाही!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.