65 वर्षांपूर्वी प्रभात : शस्त्रक्रियेतील नव्या शोधामुळे कुणीही कुरूप राहणार नाही

ता. 21, माहे नोव्हेंबर, सन 1955

भारतीय कला – परदेशी चित्रपटांतील बहुतेक नटींची नाके अगदी जशी असावीत तशी असलेली आढळतात. परंतु जन्मतःच त्या सर्वांची नाके तशी असतात अशी समजूत करून घेण्याचे कारण नाही. आजकाल “प्लॅस्टिक सर्जरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया कौशल्याची ती जादू आहे. इतिहासाचे अवलोकन करता असे दिसते की, नाके ठाकठीक करण्याची प्लॅस्टिक सर्जरी ही कला भरतात प्रथम उदयास आली. भग्नहृदयी प्रेमवीर काही वेळा नाक कापत असत. त्या काळचे भारतीय वैद्य अशा स्त्रियांना कपाळावरील कातडीचा उपयोग करून तिचे नाक पूर्ववत करून देत असण्याची शक्‍यता दिसून येते. आजही हीच पद्धती अवलंबविण्यात येते; एवढेच नव्हे तर ही पद्धती “इंडियन प्लॅप मेथड’ या नावाने ओळखली जाते. भारतातून या विद्येचा प्रसार पुढे इजिप्त व इटली या देशांत झाला. 

हनुवटीचे सौंदर्य – बाजूने पाहिले असता नाकाच्या बुंध्याच्या रेषेत असणारी हनुवटी ही प्रमाणशीर म्हणता येईल. हनुवटी अगदी छोटी असणे किंवा जवळजवळ अभाव असणे हा दोष खालच्या जबड्यांची वाढ खुंटल्यामुळेच प्रायः उद्‌भवतो. अशी हनुवटीदेखील खालचा जबडा कापून तो थोडा पुढे सरकविल्यानंतर किंवा ती हनुवटी पुढे यावी म्हणून एखाद्या हाडाचा तुकडा घालून दुरूस्त करता येते.

सॅंड पेपर सर्जरी – काही व्यक्‍तींच्या बाबतीत एरव्ही सुंदर असणाऱ्या चेहऱ्यात जाड व पुढे आलेल्या ओठामुळे वैगुण्य आलेले असते. अशा ओठांच्या बाबतीतही तोंडातील आतल्या बाजूचे काही मांस कापून ओठ यथायोग्य करता येतात. देवीच्या रोगातून मुले बरी झाली की, त्यांच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण राहिल्यामुळे ती विद्रुप दिसू लागतात. मुलाच्या बाबतीत त्याचे फार नुकसान होत नाही, पण मुलीचा चेहरा असा विद्रुप झाल्यास तिचे जिणे दुःखदायक होते. यातून मार्ग काढण्यासाठी “सॅंड पेपर सर्जरी’ची कला संशोधिली असून त्यायोगे अशी खडबडीत कातडी नितळ करता येते. या शस्त्रक्रियेनुसार कातडीचा वरचा थर ती गुळगुळीत होईल अशा प्रकारे घासण्यात येतो. कातडी थंड करून ती घासण्याचे काम करता येते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.