विदेशरंग : पुतीन विरोधात जनक्षोभ

-आरिफ शेख

दोन दशकापासून रशियावर पोलादी पकड कायम ठेवणाऱ्या ब्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात स्वदेशात सध्या जनक्षोभ उसळला आहे. 2035 पर्यंत देशावर आपली पकड ठेवू पाहणाऱ्या पुतीन यांच्या समोर आव्हान उभे केले आहे ते एका मुक्‍त पत्रकार व वकिलाने. अलेक्‍सी अनातोली नवेलनी हे त्याचे नाव. काय आहे हे प्रकरण?

मागील वीसेक वर्षांत जगात अनेक सत्ताधीश आले व पायउतार झाले, मात्र भूतलावरील सर्वात मोठा देश असलेल्या रशियात मात्र ब्लादिमीर पुतीन यांचे आसन अढळ राहिले. दोनपेक्षा अधिक काळ कार्यकाळ उपभोगता येत नसल्याची तरतूद रशियन राज्यघटनेत होती. पुतीन यांनी त्यात वेळोवेळी दुरुस्ती केली. कधी पंतप्रधान तर कधी राष्ट्रध्यक्ष होत 1999 पासून ते रशियाच्या सर्वोच्चपदी विराजमान आहेत. यावरही त्यांचे समाधान नाही. आणखी पंधरा वर्षे त्यांना ही जागा सोडायची इच्छा नाही. त्यांच्या या सत्तालोलुप महत्त्वाकांक्षी फुग्याला टाचणी लावली ती अलेक्‍सी नवेलनी यांनी. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नाही. पेशाने वकील. अलीकडे युट्युबर अन्‌ मुक्‍त- शोध पत्रकार. स्वच्छ प्रतिमेमुळे भ्रष्टाचार विरोधी लढ्याची प्रेरणा. त्यांच्या हाकेला “ओ’ देऊन हजारो रशियन रस्त्यावर उतरतात. रशियात हे चित्र तसे नवलाईचे. मात्र पुतीन यांच्या कारकिर्दीत होणाऱ्या आरोपांना आता आणखी बळ मिळत होते ते नवेलनी यांनी सादर केलेल्या पुराव्यांमुळे. जनतेत असंतोष होताच. त्याला नवेलनी यांनी वाट करून दिली. भ्रष्टाचार विरोधी जनक्षोभ आता “पुतीन हटाओ’ मोहिमेत रूपांतरित होत आहे. उणे पन्नास अंश तापमान म्हणजे रक्‍त गोठविणारी थंडी. अशा वातावरणात नागरिक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणे चमत्कारापेक्षा कमी नव्हे. पुतीन यांच्यासाठी हा धक्‍का
होता. तर नवेलनी यांनाही अचंबित करणारी ती बाब होती.

विरोधकांची वासलात कशी लावायची हे रशियन नेतृत्वाला शिकविण्याची गरज नसावी. पुतीन यांनी या आधी विदेशात आश्रय घेतलेल्या विरोधकांना विषप्रयोगाने यमसदनी पाठविल्याचे जगाच्या स्मरणात असेलच. नवेलनी यांचा देखील काटा काढण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र दरवेळी ते सहीसलामत सुटले. 2010 पासून ते पुतीन यांच्या “रडार’वर आहेत. 2011 ला आंदोलन प्रश्‍नी त्यांना अटक होऊन सुटका झाली. पुढील वर्षी हाच कित्ता गिरवला गेला. 2013 ला भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला. याच आरोपामुळे 2018 ची पुतीन विरोधातील निवडणूक लढविण्यास त्यांना अपात्र ठरविण्यात आले. 2014 मध्ये साडेतीन वर्षे तुरुंगाची हवा खावी लागली. गतवर्षी पत्नी, मुलगी व मुलास गजाआड केले गेले. त्यांच्या अँटी करप्शन फाउंडेशनवर बंदी आली. 2018 ला हिरव्या रंगाची विषारी पावडर हस्तांदोलन दरम्यान वापरून नवेलनी यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. 2019 मध्ये तुरुंगात असताना त्यांच्यावर अज्ञात रसायनाचा वापर करून विषप्रयोग केला गेला. यातूनही ते बचावले. गतवर्षी 20 ऑगस्ट रोजी विमानाने ते टॉमस्कहून मॉस्कोला जात असताना विमानतळावर चहा घेतला. बशीला नोविचोक नावाचे विष लावले होते. विमानात बसल्यावर नवेलनी यांना अकस्मात त्रास सुरू झाला. ते बेशुद्ध झाले. इमर्जन्सी लॅंडिंग करावी लागली. त्यांची मज्जासंस्था कुचकामी झाली होती. बर्लिनमध्ये त्यांच्यावर उपचार केले गेले. 22 सप्टेंबरला ते यातून बरे झाले.

जानेवारीत ते मायदेशी परतले. विमानतळावरच त्यांना अटक करण्यात आली. याची त्यांना पूर्वकल्पना असावी. अटकेपूर्वी त्यांनी अनेक व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केले. त्यात सर्वात धक्‍कादायक व्हिडिओ होता तो रशियातील एका आलिशान महालाचा. जगातील सर्वात मोठ्या लाचेच्या रकमेतून तो राजवाडा उभारला गेला होता. अन्‌ हा महाल पुतीन यांचा असल्याचे व तो उभारण्यासाठी कोणत्या कंपन्याद्वारे पैसे कोणी व कसे पुरविले याचे अनेक पुरावे नवेलनी यांनी जाता जाता उघड केल्याने रशियात खळबळ उडाली. क्रेमलीनचे प्रवक्‍ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी पुतीनवरील सर्व आरोप फेटाळले. मात्र त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. हजारो रशियन देशाच्या प्रमुख शहरात पुतीन विरोधात व नवेलनी यांच्या बाजूने उभे राहिले. पुतीन यांच्या आजवरील एकाधिकारशाहीला ते आव्हान होते. त्यांना हा लोकक्षोभ अपेक्षित नसावा. नवेलनी हे विदेशी एजंट आहेत. रशियाला खिळखिळे करणाऱ्या शक्‍तींच्या हातचे बाहुले आहेत, असे प्रत्युत्तर दिले गेले. जनतेला हा युक्‍तिवाद पटला नाही. पुतीन यांच्या महत्त्वाकांक्षी व बेबंदशाही कारभाराला नवेलनी यांच्या पारदर्शी प्रतिमेने खिळखिळे जरूर केले.

तुरुंगात आपला अकस्मात मृत्यू घडविला जाईल, कदाचित त्यास आत्महत्या म्हणून जगापुढे आणले जाईल, अशी भीती नवेलनी यांना वाटत होती. त्यांनी तुरुंगात जाण्यापूर्वी पुन्हा एक व्हिडिओ अपलोड केला. मी मुळीच आत्महत्या करणार नाही, याची तुम्ही खात्री बाळगा, असे ठासून सांगत त्यांनी पुतीन यांचा संभाव्य मनसुबा उधळून लावला. नवेलनी यांच्यावर विषप्रयोग झाल्यापासून जनतेत असंतोष खदखदत होता. ते मायदेशी परतल्यावर या असंतोषाचे उद्रेकात रूपांतर झाले. जीवावर बेतले असताना देखील ते मायदेशी परतले. त्यांच्या पुनरागमनामुळे जन आंदोलनास आणखी बळ लाभले. ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले.

पुतीन यांच्या दोन दशकांच्या कारकिर्दीचा लोकांना तिटकारा वाटू लागला. नवेलनी यांनी केलेले आरोप पुतीन यांची प्रतिमा मलिन करून गेले. नवेलनी यांनी अपलोड केलेल्या व्हिडिओला काही दिवसांत कोट्यवधीचे दर्शक लाभले. त्यावर देखील पुढे बंदी आली. देशाच्या निवडणुकीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचा आरोप पुतीनवर होताच, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात मागील पंचवार्षिक निवडणुकीत रशियन हॅकर्सनी कशी मदत केली, हे जगजाहीर झाल्यावर पुतीन यांच्यावरील देशांतर्गत आरोपांना आपसुक पुष्टी मिळाली. पुतीन यांच्या महत्त्वाकांक्षेला अन्‌ खुर्चीप्रेमाला नवेलनी यांनी सुरुंग लावला आहे. जगाचे लक्ष त्यांनी वेधून घेतले आहे.

पुतीन समर्थक त्यांचा गद्दार किंवा खलनायक म्हणून उद्धार करीत असले, तरी त्यामुळे पुतीन यांची कलंकित प्रतिमा उजळ होत नाही. पुतीन यांच्या सत्तालोलुप वृत्तीला उभे राहिलेले आव्हान ते कसे पेलतात याकडे जगाचे आता लक्ष असेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.