महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेशी संवाद साधताना करोना संकटाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर लोकांना काही मूलभूत बंधने पाळण्याचे आवाहन केले होते. राज्यातील नागरिकांनी जर ही बंधने पाळली नाहीत, तर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये दिला होता. त्यानंतर राज्यातील नागरिक मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे पालन करण्याबाबत जागरूक झाले असले, तरी गेल्या काही दिवसांमध्ये गर्दी होण्याचे जे प्रकार घडले आहेत त्याला जबाबदार सामान्य नागरिक नसून काही राजकीय नेते आहेत, हेसुद्धा विसरता कामा नये.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाचा परिणाम राज्यातील सामान्य नागरिकांवर होत असताना त्याकडे राजकीय नेते मात्र दुर्लक्ष करताना दिसत असतील, तर त्याचा गंभीर विचार होण्याची गरज आहे. राज्यात सर्व प्रकारचे सभा, समारंभ आणि धार्मिक कार्यक्रम यांच्यावर बंदी घालण्यात आली असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केली असतानाही अशी गर्दी जमवण्याचे उद्योग राजकीय पक्षाशी संबंधित लोकांनीच केले आहेत, हे दुर्दैवच म्हणावे लागेल आणि या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार कोणती कारवाई करणार, हे पाहणेही मनोरंजक ठरणार आहे.
ठाकरे यांच्या भाषणाच्या आदल्या दिवशीच पुण्यामध्ये भाजपचे कोल्हापूरमधील नेते धनंजय महाडिक यांच्या पुत्राचा विवाह सोहळा पार पडला होता. या विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. कॉंग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या सर्वच राजकीय पक्षांचे नेते या विवाह समारंभाला उपस्थित होते. राज्यात विवाह समारंभासाठी जे नियम घालून देण्यात आले आहेत त्या नियमांचा विसर या विवाह समारंभात पडल्याचे दिसून आले. विविध वृत्त वाहिन्यांवर दाखविण्यात आलेल्या बातम्यांवरून तरी तसेच दिसून येते. दुसरे उदाहरण आहे, महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांचे. पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूनंतर गेले कित्येक दिवस अज्ञातवासात गेलेले संजय राठोड अचानक समोर आले आणि थेट माध्यमांशी सामोरे गेले. त्यावेळी त्यांनी चांगलेच शक्तीप्रदर्शन केले. त्या शक्तीप्रदर्शनामध्येही दहा हजारांपेक्षा जास्त नागरिक समाविष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.
पूजा चव्हाण यांच्या मृत्यूबाबत संजय राठोड यांच्याकडे संशयाचे बोट दाखवले जात असल्यानेच त्यांनी शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून अज्ञातवासातून बाहेर येण्याचा पर्याय स्वीकारला; पण अशी कोणतीही गोष्ट करताना त्यांना करोना काळातील सामान्य नियमांचा विसर पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या घटनेची गंभीर दखल घेत असल्याची माहिती समोर येत आहे; पण संजय राठोड यांच्यावर कोणती कारवाई करण्यात येईल, हे मात्र उत्सुकतेचे ठरणार आहे. वाशिम जिल्ह्यातील ज्या पोहरादेवी या गावामध्ये हजारो नागरिक संजय राठोड यांच्या स्वागतासाठी जमले होते त्या नागरिकांपैकी दहा हजार लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तेथील पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
आपल्या नेत्याच्या आवाहनानुसार किंवा आदेशानुसार जमा होणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल होतो; पण या गर्दी जमा होण्यास कारणीभूत असलेल्या नेत्यांवर अद्यापही काही कारवाई होत नाही, हे आश्चर्यच मानावे लागेल. राजकीय नेत्यांची ही अशी परिस्थिती असताना दुसरीकडे राज्यातील काही गुंडांनीही कायदा व सुव्यवस्थेचा विचार न करता गर्दी जमवल्याची उदाहरणे दिसत आहेत. पुणे जिल्ह्यातील गुंड गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याचे ज्याप्रकारे गर्दी जमवून स्वागत करण्यात आले तो प्रकार निश्चितच निंदनीय होता; पण करोना काळातील नियमांचा मोठ्या प्रमाणावर भंग करणारा होता.
पिंपरी-चिंचवड परिसरातील एका गुंडानेही दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे गर्दी जमवून दहशत माजवण्याचा प्रकार केल्याची घटना समोर येत आहे. या सर्व घटनांची गंभीर दखल घेऊन कदाचित सर्व संबंधितांवर कारवाई केली जाईल; पण सर्वसामान्य नागरिकांनी करोना काळातील नियमांचा भंग केल्यानंतर ज्या जलद गतीने त्यांच्यावर कारवाई होते ती जलद गती या कारवाईबाबत दाखवली जाणार का नाही, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. सध्या विवाह समारंभांचे मुहूर्त असल्याने राज्यातील अनेक मंगल कार्यालयांमध्ये विवाह समारंभ पार पडत आहेत. केवळ चुकीने वऱ्हाडी लोकांची संख्या ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त झाली तर लगेच मंगल कार्यालयांचे चालक आणि संबंधित विवाहाचे संयोजक यांच्यावर कारवाई केली जाते आणि मोठ्या प्रमाणात दंडही ठोठावला जातो.
दुसरीकडे केवळ गर्दी होऊ नये म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. शैक्षणिक संस्था व्यवस्थित सुरू असल्या तरी त्यांचे कामकाज नियमानुसार चालत आहे की नाही, हे पाहण्यासाठी वेळोवेळी अचानक धाडी घालण्यात येत आहेत. या सर्व गोष्टींमुळे सामान्य नागरिकांच्या वर्तणुकीत सुधारणा झाली असली तरी राजकीय नेते आणि नामचीन गुंड जी गर्दी जमवत आहेत त्याच्यावर नियंत्रण कसे ठेवायचे, याचाच विचार आता सरकारला प्राधान्याने करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी “माझे कुटुंब माझे जबाबदारी’ ही मोहीम यशस्वीपणे राबवल्यानंतर दोन दिवसांपूर्वी केलेल्या भाषणामध्ये “मीच जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेला गांभीर्याने घेऊन सामान्य नागरिक जर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत असतील, तर या सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय नेत्यांनी निष्काळजीपणा दाखवला तर अनेक नागरिकांवर कारवाई करण्याचे नैतिक बळ राज्य सरकारला मिळणार नाही.
महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या माध्यमातून सर्वांना योग्य संदेश देण्याची गरज आहे. आमच्यावर कोण कारवाई करतो, या आत्मविश्वासाने जर सत्ताधारी राजकीय पक्षांचे नेते गर्दी जमवण्याचे पाप करत असतील, तर त्यांचा हा भ्रमाचा भोपळा फोडण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करावेच लागेल. प्रमुख राजकीय नेत्यांवर गर्दी जमवल्याबद्दल कारवाई झाल्यानंतरच अशा प्रकारच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यश येऊ शकेल, ही गोष्ट नाकारता येणार नाही.