विविधा : नारायणराव बोरावके

-माधव विद्वांस

कृषितज्ज्ञ, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच वर्ष 1932 मध्ये सासवड माळीनगर साखर कारखान्याच्या स्थापनेत पुढाकार घेणारे रावबहादूर नारायणराव सोपानराव बोरावके यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 17 आक्‍टोबर 1892 रोजी सासवड येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सखुबाई होते तर पत्नीचे नाव लक्ष्मीबाई, त्या नारायणरावांच्या सतत फिरती व कामाच्या व्यापात त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभ्या राहिल्या होत्या.

हिंदुस्थानावर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा सन्माननीय व्यक्‍तींना सर, रावबहादूर, रावसाहेब अशा उपाध्या देत.या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती. 1933 मध्ये त्यांना “रावसाहेब’ तर 1946 मध्ये त्यांना “रावबहादूर’ हे किताब मिळाले. एक सामान्य शेतकरी असलेल्या नामदेवरावांना त्यांच्या असामान्य कर्तृत्वामुळे ही उपाधी मिळाली होती. रयत शिक्षण संस्थेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. पुण्यातील टिळकरोडवरील महाराष्ट्र मंडळाचे आश्रयदाते होते. बॅंक ऑफ कराडचेही ते संचालक होते. त्यांनी अनेक संस्थांना आर्थिक व नैतिक पाठबळ दिले होते.

पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ग्रामीण भागांत अनेक संस्था व उद्योग यांचे जाळे त्यांनी उभे केले. बोरावके यांचे शिक्षण कमी असल्याची खंत त्यांना होती. त्यांनी शिक्षण प्रसारावर पण भर दिला होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक शाळा व महाविद्यालये स्थापन केली. काही काळ ते रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षही होते. त्यांनी सासवड येथे लक्ष्मीबाई वसतिगृहाची स्थापना केली.

सासवड माळीनगर सहकारी साखर कारखान्याचे ते प्रवर्तक होते. गणपतराव गिरमे, शंकरराव कुडाळे, शंकरराव राऊत, गणपतराव रासकर यांच्या सहकार्याने 1932 मध्ये त्यांनी साखर कारखाना उभा करण्याचा संकल्प केला. त्यावेळी सहकार कायदा अस्तित्वात नसल्याने सर्व प्रवर्तकांनी भागीदारी फर्म काढून 1934/35 चा पहिला गळीत हंगाम पार पाडला. यावेळी त्यांचे सहकारी संचालकांनी उत्तर प्रदेश, तेलंगणामधील साखर उद्योगाची पाहणी केली. त्यांच्या नावाने सध्या अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये व इतर विषयातील विद्यालये सुरू आहेत. त्यांनी कोपरगाव जवळील कोळपेवाडी येथे सहकारी साखर कारखाना उभारणीत मोलाचे योगदान दिले होते.

शेतीच्या आधुनिकतेवर त्यांनी भर दिला. संशोधित फळांच्या उत्पादनास त्यांनी प्रोत्साहन दिले. पारंपरिक शेतीअवजारे वापरण्याऐवजी आधुनिक अवजारे वापरण्यावर भर दिला. शेती अवजारे बनविणाऱ्या किर्लोस्करवाडीच्या किर्लोस्कर कारखान्याचे ते संचालकही होते. शेतीला मोटे ऐवजी स्वयंचलित पंपाद्वारे पाणी देण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

1929 ते 1935 या कालावधीमध्ये ते अहमदनगर जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्यही होते. 1953 च्या दुष्काळ समितीवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले होते. महात्मा फुले संग्रहालय (आधीचे नाव लॉर्ड रे म्यूझियम) या पुणे शहरातील जुन्या संग्रहालयाचे विश्‍वस्त होते. राहता येथे जनावरांचा दवाखाना काढून तो ग्रामपंचायतीस सुपूर्त केला. या कर्तृत्ववान भूमीपुत्राचे 16 फेब्रुवारी 1968 रोजी निधन झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.