फौजा परत घेण्यास चीनचा नकार
रंगून, ता. 18 :- राष्ट्रीय चीनला आक्रमक राष्ट्र ठरवून त्या राष्ट्राविरोधात उपाययोजना करण्यात यावी आणि फॉर्मोसा सरकारला यूनोतून घालवून द्यावे, अशी मागणी ब्रह्मदेश यूनोकडे करणार असल्याचे समजते.
वाटाघाटी फिसकटल्या
ब्रह्मदेशात असलेल्या राष्ट्रीय चीनच्या फौजा तेथून काढून नेण्याबाबतच्या बॅंकॉक येथे चालू असलेल्या चौराष्ट्र (ब्रह्मदेश, राष्ट्रीय चीन, अमेरिका आणि थायलंड) वाटाघाटी फिसकटल्याने ब्रह्मदेश वरील मार्ग स्वीकारणार असल्याचे माहीतगार गोटांतून कळते.
सर्व सूचनांस नकार
ब्रह्मदेशात राष्ट्रीय चीनने सैन्य एकंदरीत किती आहे ते सांगण्याबाबत इतर तीनही राष्ट्रांनी एकसारखी विनंती केली असताही राष्ट्रीय चीनच्या प्रतिनिधीने ते सांगण्याचे नाकारले; एवढेच नव्हे तर दररोज 150 ह्या प्रमाणांत राष्ट्रीय चीनने आपले सैनिक ब्रह्मदेशातून परत घ्यावे, अशी अमेरिकेने केलेली सूचना ही स्वीकारली नाही. ह्यावरून ह्या वाटाघाटी मोडण्याची सर्व जबाबदारी फोर्मोसा सरकारवरच पडते हे स्पष्ट होत आहे, असे येथे सांगण्यात येते.
तीन विरुद्ध एक
बॅंकॉकहून आलेल्या बातमीवरून असे समजते की, कालच्या चौराष्ट्र चर्चेत चीनने ब्रह्मदेशातून आपली किमान 5000 सेना करारावर सह्या झाल्यापासून 35 दिवसांत आणि बाकी राहिलेल्या 3 महिन्यांचे आत परत न्यावी अशी सूचना ब्रह्मी प्रतिनिधीने केली. अमेरिकन आणि सयामी प्रतिनिधीने त्यास पाठिंबा दर्शविला. परंतु चिनी प्रतिनिधीने ती मान्य करण्याचे नाकारले.
ह्या धमक्या थांबवा; तटस्थ राष्ट्र कमिशनकडे दक्षिण कोरियाची तक्रार
सेऊल -कम्युनिस्ट युद्धबंदी परत आले नाहीत तर त्यांच्या कुटुंबीयांचे “काही तरी’ होईल अशी जी धमकी उत्तर कोरियन युद्धबंद्यांची समजावणी आणि मनधरणी करणाऱ्या लोकांकडून देण्यात येते ते जर थांबवण्यात आले नाही तर आपण आपल्या ताब्यातील मायदेशी परतण्यास तयार नसलेले उत्तर कोरियन युद्धबंदी तटस्थ राष्ट्रकमिशनच्या ताब्यात देण्याचे थांबवू, अशी धमकी मेजर-जनरल वॉन यंग डूक ह्यांनी जाहीरपणे दिली आहे.