कोयना योजनेची वीज तयार झाली तरी दक्षिण-पूर्व महाराष्ट्राला तूर्त मिळणार नाही!
पुणे, ता. 31 – कोयना योजना पूर्ण झाली म्हणजे महाराष्ट्राला वीज पुरवठा करण्यास सुरुवात होईल असे आश्वासन उच्चपदस्थांकडून वारंवार देण्यात येत असले तरी तशी आशा बाळगण्यासारखी आज तरी परिस्थिती नाही असे निश्चितपणे समजते.
कोयना योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला म्हणजे एकूण 2,40,000 कि. वॅ. वीज निर्माण व्हावयाची आहे व त्यापैकी 2 लक्ष कि. वॅ. वीज मुंबई-पुणे विभागाला पुरविण्यात यावयाची असून बाकीची 40 हजार कि. वॅ. वीज दक्षिण व पूर्व महाराष्ट्रातील भागाला मिळावयाची आहे. महाराष्ट्राला वीज पुरवठा करणारी योजना “कऱ्हाड-सोलापूर योजना’ या नावाने ओळखली जाते. या योजनेसाठी तीन कोटी रुपये खर्च येणार आहे.
हा खर्च परदेशी चलनाच्या स्वरूपात व्हावयाचा असून त्यासाठी एवढ्या रकमेचे परदेशी चलन उपलब्ध करून देण्याकरिता मुंबई सरकारने केंद्र सरकारकडे खटपट चालवली आहे. काही वृत्तपत्रांनी “कोयनेची वीज तूर्त तरी महाराष्ट्राला मिळत नाही’ ही वस्तुस्थिती मांडली.
स्त्रियांचा बाजारावर हल्ला!धान्य लुटले!
झांशी – अन्नधान्याचे दुकानांवर हल्ला करून लुटालूट केली आणि धान्य विस्कटून टाकले या आरोपावरून 14 स्त्रियांना अटक करण्यात आली आहे. काल सुमारे 36 स्त्रियांनी बाजारावर हल्ला केला. धान्याची लुटालूट केली आणि धान्य इतस्ततः विस्कटून टाकले.
त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा पाठलाग करण्यात आला. 14 जणींना पकडण्यात आले. स्त्रियांच्या या धाडसी दरोड्याने बाजारात घबराट माजली. दुकाने भराभर बंद झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शांतता प्रस्थापित केली.
गुजराथमध्ये महागाई
अहमदाबाद – गुजराथ भागांत सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडले असून त्यासंबंधी गुजराथ कॉंग्रेसचे एक सातजणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री चव्हाणांना भेटायला जाणार आहे. गुजराथ प्रदेश कॉंग्रेसने या शिष्टमंडळाची नियुक्ती केली असून, नेतृत्व प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष मगनभाई पटेल यांचेकडे आहे. भाव खाली आणण्यासंबंधी सरकारला विधायक सूचना करण्यातयेणार आहे.