पुणे महापालिका सभासदांना मानधन
पुणे, ता. 12 – पुणे महानगरपालिकेच्या सभासदांना मानधन घेण्यास मुभा असावी असा निर्णय संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मध्यवतीने घेतला आहे. महानगरपालिका समिती पक्षामधे याबाबत मतभेद झाला होता म्हणून हा प्रश्न मध्यवर्ती समितीकडे सुपूर्द करण्यात आला होता. मध्यवतीने वरीलप्रमाणे निर्णय दिला आहे.
रेल्वे साखळी ओढली तर 3 महिने शिक्षा
नवी दिल्ली – धोक्याच्या साखळीचा दुरुपयोग, बिगर तिकिटाचा प्रवास, परवान्याशिवाय मालविक्री करणे आणि रेल्वे नोकरांना धमकावणे या गुन्ह्यासाठी सध्यापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद करणारे विधेयक लोकसभेत संमत झाले. साखळीच्या दुरुपयोगाला 3 महिने सक्त मजुरी व 250 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नेपाळची नवी घटना जाहीर
काठमांडू – वसंत पंचमीचा मुहूर्त साधून नेपाळचे राजे महेंद्र यांनी नेपाळची घटना जाहीर केली. ही घटना अमलात येण्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. या घटनेची एकूण 77 कलमे आहेत. या घोषणेच्या व वसंत पंचमीच्या समारंभासाठी लष्करी व मुलकी वरिष्ठ अधिकारी हजर होते.
गोऱ्या पोरांसमवेत नीग्रो मुलांना मोटारीत प्रवेश
अलेक्झांड्रिया – काल गोऱ्यांच्या शाळेत नीग्रो मुलांना प्रवेश देण्यात आला आणि प्रथमच गोऱ्या पोरांच्या बसमध्येही नीग्रो मुलांना प्रवेश देण्यात आला. या दोन्ही प्रसंगी गडबड झाली नाही. येथील शाळांच्या इतिहासात हा अभिनव प्रकार प्रथमच घडला.
स्त्रीचा अवमान केला म्हणून खटला भरला
पुणे – असभ्य भाषा वापरून सार्वजनिक ठिकाणी एका स्त्रीचा अवमान केल्याच्या आरोपावरून रेल्वे पोलिसांनी एकावर बॉंबेऍक्टच्या 110 कलमाखाली खटला भरला.