हवाई किंवा खुश्कीच्या मार्गाने आक्रमण झाले तर प्रतिकाराची संपूर्ण सज्जता
नवी दिल्ली, ता. 16 – संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांनी आज लोकसभेत महावीर त्यागी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना असे सांगितले की, भारताच्या भूमीवर खुश्कीच्या मार्गाने अगर हवाई मार्गाने कोणाही राष्ट्राकडून आक्रमण झाले तर त्याविरुद्ध प्रतिकाराची शक्य ती सर्व तयारी करण्यात आली आहे.
गुजराथची तात्पुरती राजधानी-अहमदाबादेत
अहमदाबाद – संकल्पित गुजराथची राजधानी तात्पुरती येथे ठेवण्यात येणार आहे. सरकारी कचेऱ्यांची बहुतेक सारी व्यवस्था आता पूर्ण होत आली आहे असे समजते. अहमदाबाद शहर 500 वर्षंचे जुने आहे. तथापि नव्या राजधानीसाठी बंगले अपुरे पडत आहेत. हाउसिंग सोसायट्यांच्या साह्याने सरकारने जरूर तेवढ्या इमारती ताब्यात घेतल्या आहेत.
पुण्यातील एक महान आश्चर्य!
पुणे – गेल्या 24 तासांत पुणे शहरात, खडकी भागात व कॅम्पात एकही गुन्हा घडून आला नाही. कोणत्याही पोलीस स्टेशनवर गुन्हाची नोंद नाही. पोलिसांनासुद्धा या गोष्टीचे महदाश्चार्य वाटत आहे.
चीन अणुबॉंबस्फोट करणार नाही – नेहरू
नवी दिल्ली- चीन अणुबॉंबचा स्फोट करील अशी शक्यता फारच थोडी आहे असे मत नेहरूंनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
दलाई लामांना मसुरीहून हलविणार
नवी दिल्ली – प. नेहरूंनी दलाई लामांबद्दल असा खुलासा केला की, दलाई लामा यांना “धर्मशाळा’ (पंजाब) येथे वस्तीसाठी हलविण्यात येणार आहे. मसुरी हे प्रवासी येण्याजाण्याचे ठिकाण असल्यामुळे दलाई लामांना ते गैरसोयीचे होते. म्हणून त्यांचा मुक्काम तेथून हलविण्याचा सल्ला त्यांना सरकारने दिला आहे.