पाचव्या योजनेत शैक्षणिक सोयीत क्रांती
नवी दिल्ली, ता. 15 – पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारतातील सर्व विद्यापीठांत परीक्षांना व शालेय परीक्षांना बाहेरून कामगार आदी लोक बसू शकतील. त्यासाठी 23 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
नगरपालिका आयोगाची स्थापना
मुंबई – महाराष्ट्रातील नगरपालिकांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी नगरपालिका आयोगाची स्थापना करण्यात आल्याचे आज महाराष्ट्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आले.
अरबांची वंशहत्या करण्याचा इस्रायलचा प्रयत्न
नवी दिल्ली – अरब स्त्रियांचे गर्भप्रतिबंधासाठी ऑपरेशन करावे व त्यासाठी त्यांची परवानगी घेण्याचे कारण नाही. शिवाय त्यांना ते समजता कामा नये, असे हुकूम व्याप्त अरब प्रदेशातील इस्रायली डॉक्टरांना देण्यात आले आहेत. याशिवाय अरबांची वंशहत्या करण्याचे हुकूम देण्यात आले आहेत. साथीचे रोग पसरवून व संतती प्रतिबंधासारखे उपाय योजून ही गोष्ट साध्य करण्याचा त्यांचा हेतू आहे.
स्त्री शिक्षणामुळे पुढील पिढी अधिक सुशिक्षित होईल
पुणे – “सुशिक्षित मातांची मुले अशिक्षित कधीच राहू शकणार नाहीत. हुजूरपागा या संस्थेने 89 वर्षांपूर्वी जी स्त्री शिक्षणाची मोहीम सुरू केली त्यामुळे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच. स्त्री शिक्षणाचे बीज समाजात रुजत चालले आहे. त्यामुळे पुढची पिढी अधिक सुशिक्षित होईल’, असे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे “सौ. विमलाबाई गरवारे क्रीडा मंदिराचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले.