धान्यवाटपातील गैरप्रकार हुडकून काढण्याची मोहीम
पुणे, ता. 2 – पुणे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांत व धान्य वाटपात चालणारे गैरप्रकार हुडकून काढून त्याविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम जिल्हाधिकाऱ्यांनी उघडली आहे. गेल्या चार महिन्यांत 1 लाख 6 हजार 221 बोगस युनिटस सापडली. तसेच 87 स्वस्त धान्य दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. 25 दुकानदारांचे परवाने रद्द केले. यापुढे ही मोहीम चालू राहणार आहे.
440 पाक युद्धकैद्यांना मायदेशी पाठविणार
नवी दिल्ली – आणखी 440 पाक युद्धकैद्यांना व नागरिकांना वैद्यकीय कारणामुळे पाकिस्तानकडे पाठवून देण्याचा निर्णय आज भारत व बांगलादेशाने एकमताने घेतला.
सेन्सार बॉर्डाच्या सदस्यांनाच सेन्सार करा
न्यूयॉर्क – हिंदी सिनेमा नट शत्रुघ्न सिन्हा यांनी असे मत व्यक्त केले की, फिल्म सेन्सार बोर्डातील सदस्यांनी स्वतःलाच प्रथम सेन्सार केले पाहिजे. भारतात सिनेमावर इतकी नियंत्रणे लादली जातात की, त्यांचा विचार करून चित्रपट काढण्याचे काम ताजमहाल बांधण्याइतके दुर्घट आहे. ते युरोप व अमेरिका दौरा करण्यासाठी येथे आले आहे.
वीज उत्पादनाची प्रगती सहाव्या पंचवार्षिक योजनेत होणार
कोडाइकॅनाल – वीज उत्पादनाच्या प्रगतीमध्ये सहाव्या पंचवार्षिक योजनेत सरकार प्रामुख्याने भाग घेईल अशी माहिती वीज खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री के. एल. राव यांनी आज येथे दिली.